कर्मचाऱ्यांचे पगार थकले
By Admin | Updated: June 15, 2017 00:32 IST2017-06-15T00:31:24+5:302017-06-15T00:32:01+5:30
ग्रामपंचायत : धनादेश न वटल्याने गैरसोय

कर्मचाऱ्यांचे पगार थकले
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले जिल्हा बँकेचे चार ते पाच महिन्यांपासूनचे धनादेश वटत नसून त्यांना चलनपुरवठा करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देवळा शाखेचे विभागीय अधिकारी रत्नाकर हिरे यांना देण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे जिल्हा बँकेत ग्रामनिधी व पाणीपुरवठ्याचे खाते आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनापोटी ग्रामपंचायतीकडून नोव्हेंबर, जानेवारीचे जिल्हा बँकेचे धनादेश देण्यात आले; पण सदरचे धनादेश जिल्हा बँकेतील चलन तुटवडा व बॅँकेवरील क्लीअरिंग बंदीमुळे वटत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना बँकेतून चलन न मिळाल्याने कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड झाले. सदरचे धनादेश क्लीअर करण्यात येऊन चलनपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या देवळा तालुका संघटनेकडून करण्यात आली आहे.
यावेळी देवळा तालुकाध्यक्ष शुभानंद देवरे, भाऊसाहेब अहिरे, प्रकाश शिंदे, ईश्वर मोरे, पप्पू गुंजाळ, संजय सोनवणे, संजय जगदाळे, पुंडलिक सावंत, सतीश आहिरे, भूषण आहिरे, नाना देवरे, अशोक सोळसे आदी कर्मचारी उपस्थित होते.