कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले : केंद्रचालकाला नोटीस

By Admin | Updated: October 22, 2014 22:57 IST2014-10-22T22:56:55+5:302014-10-22T22:57:17+5:30

‘सेतू’ कार्यालयाला ‘सील’

Employee's salary stops: Center notice notice | कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले : केंद्रचालकाला नोटीस

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले : केंद्रचालकाला नोटीस

नाशिक : सेतू कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न दिल्याने ऐन सणासुदीत या कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे हत्त्यार उपसावे लागले असून, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सेतू कार्यालयच वाऱ्यावर सोडल्याने त्याची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी कार्यालयाला सील ठोकले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यासाठी सेतू कार्यालय सुरू करण्यात आले असून, ते चालविण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या दाखल्यांची कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर ते अर्जदारास अदा करण्याच्या मोबदल्यात घेतल्या जाणाऱ्या शुल्कातूनच ठेकेदार त्याचा मेहनताना वसूल करीत असल्याने त्यातून त्याने सेतू कार्यालयाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन या साऱ्या बाबींची पूर्तता करणे अपेक्षित आहे; परंतु नाशिक तालुक्याच्या सेतूचालकाने गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीसारखा सण तोंडावर आलेला असतानाही सेतूचालकाकडून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सुरू झाल्याने सोमवारपासून येथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी अचानक संपाचे हत्त्यार उपसले व कार्यालय उघडे टाकले. सदर कार्यालयात अनेक शासकीय दस्तावेज असल्याने त्याला हानी पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार गणेश राठोड यांनी सेतू कार्यालयाला सील ठोकले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कामकाज ठप्प होऊन त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असून, सेतू ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करणे व त्यातून कामकाजास बाधा पोहोचणे या बाबी गांभीर्याने घेऊन तहसीलदारांनी ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून आपल्या अनुमतीशिवाय सेतू कार्यालय सुरू करू नये, अशी सूचनाही दिली आहे. विशेष म्हणजे, सेतू कर्मचाऱ्यांचा संप व कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याबाबतची कोणतीही सूचना ठेकेदाराने प्रशासनाला दिलेली नाही. सदर ठेकेदाराची मुदत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच संपुष्टात आलेली असून, त्यानंतर नवीन ठेका कोणालाही न देता प्रशासनाने निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्या ठेकेदारालाच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या असहाय्यतेचा सेतू ठेकेदाराने लाभ उचलून प्रशासन व पर्यायाने नागरिकांनाही वेठीस धरले आहे.

Web Title: Employee's salary stops: Center notice notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.