कर्मचाऱ्यांच्या विभागाची अन् कामांची मागविली माहिती
By Admin | Updated: November 8, 2014 00:31 IST2014-11-08T00:31:02+5:302014-11-08T00:31:47+5:30
कर्मचाऱ्यांच्या विभागाची अन् कामांची मागविली माहिती

कर्मचाऱ्यांच्या विभागाची अन् कामांची मागविली माहिती
नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचारी व त्यांचे कामकाज यासंदर्भातील सर्व तपशीलवार माहिती शिक्षण व आरोग्य सभापती सौ. किरण पंढरीनाथ थोरे यांनी मागविली असून, प्रशासनाला त्यासंदर्भातील पत्र देणार असल्याचे सौ. थोरे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘लोकमत’नेच सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयातील चाळीस कर्मचाऱ्यांच्या खांदेपालटाची केलेली कार्यवाही कागदावरच असल्याचे तसेच यासंदर्भात ‘कर्मचारी बदलीच्या जागी हजर झाले काय?’ हे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या कार्यवाहीच्या पाठपुराव्याबाबते वृत्त ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे टेबल आणि विभाग बदलले असले, तरी काही कर्मचारी आहे त्याच विभागात वारंवार चकरा मारून कामकाज करीत असल्याची चर्चा होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच खातेप्रमुख व बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडून लेखी स्वरूपात खुलासा मागविला होता. काही कर्मचाऱ्यांनी खुलासा पाठविला असून, काही कर्मचारी खुलासा पाठवित आहेत. मात्र काही विभागांत कर्मचारी काम एक आणि प्रत्यक्षात भलतेच काम करीत असल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षण व आरोग्य सभापती सौ. किरण थोरे यांनी शिक्षण व आरोग्य विभागासह सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांची व ते करीत असलेल्या कामकाजाची लेखी स्वरूपात प्रशासनाकडून माहिती मागविली असल्याचे कळते. (प्रतिनिधी)