प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे
By Admin | Updated: October 16, 2015 22:03 IST2015-10-16T22:01:35+5:302015-10-16T22:03:09+5:30
आदिवासी विकास विभाग : दिंडोरी आश्रमशाळा

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे
नाशिक : क्रिष्णा वृंदावन प्रतिष्ठान अंबरनाथ (ठाणे) संचलित दिंडोरी येथील विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा दिंडोरी येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी काल (दि. १५) आदिवासी
विकास विभागासमोर धरणे आंदोलन केले.
याबाबत आदिवासी विकास विभाग आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन व अडचणी, तसेच समस्यांबाबत संस्थेसह या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्राथमिक/माध्यमिक यांच्या आडमुठे धोरणाबाबत, तसेच या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी न मिळणाऱ्या वेतनाबाबत याआधीही वेळोवेळी निवेदने दिलेली
आहेत.
मात्र त्याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे आॅगस्टपासूनचे वेतन रखडलेले आहे. याउलट नाशिक प्रकल्पातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन प्राप्त झालेले असून, विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मात्र
अद्याप बिले मिळालेली नाहीत. वेतनाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगूनही यांच्या आडमुठेपणामुळे वेतन निघत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
यावेळी आंदोलनात के. डी. देवरे, व्ही. के. कासार, पी. डी. सूर्यवंशी, सी. एम. धामणे, आर. के. सावंत, ए. एस. निकम, ए. एन. परदेशी, एस. सी. देसले, एस. डी. चव्हाण, पी. पी. भामरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)