क्रॉम्प्टनच्या तीनशे कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव
By Admin | Updated: March 11, 2017 17:54 IST2017-03-11T17:54:10+5:302017-03-11T17:54:10+5:30
क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार

क्रॉम्प्टनच्या तीनशे कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव
नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली असून, कंपनीच्या वर्तणुकीमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, क्रॉम्प्टन कंपनीत आयटक युनियनचे कामगारांनी सभासदत्व घ्यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर दबाव टाकला जात असून, २०१५ पासूनचा पगारवाढीचा करार बहुमत असलेल्या युनियनसोबत करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. प्रस्थापित युनियन व व्यवस्थापन सेवा निवृत्त होणाऱ्या कामगारांना आर्थिक नुकसान करून घेत असल्याचे सांगून इच्छा नसतानाही जबरदस्तीने आयटक युनियनचे सभासदत्व स्वीकारावे यासाठी दबाब टाकत आहे. कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात ११ मे २०१५ रोजी कामगारांनी कायदेशीररीत्या सूचना देऊन संप केला असतानाही तो बेकायदेशीर असल्याचे ठरवून अठरा कामगारांना निलंबित करण्यात आले. असे निलंबन करताना चुकीच्या पद्धतीने कामगारांना गोवण्यात आले व त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.