कर्मचारी संघटनांचा मोर्चा

By Admin | Updated: March 21, 2016 23:36 IST2016-03-21T23:16:36+5:302016-03-21T23:36:09+5:30

कर्मचारी संघटनांचा मोर्चा

Employees' Association Front | कर्मचारी संघटनांचा मोर्चा

कर्मचारी संघटनांचा मोर्चा

 सिन्नर : इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ व दमबाजी केल्याच्या निषेधार्थ येथील विविध कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले. संबंधित इगतपुरी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले.
सिन्नर पंचायत समितीच्या कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शिरोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राजपत्रित अधिकारी संघटना, सहायक गटविकास अधिकारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, लिपिकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, ग्रामसेवक युनियन यांच्यासह सुमारे १३ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे हे गटविकास अधिकारी किरण कोवे, विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे, सुनील पाटील यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सभापती लहांगे यांच्यासह उपसभापती पांडुरंग वारुंगसे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना नेहमीच अर्वाच्च भाषेत बोलतात व दमबाजी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराला कंटाळून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व अपात्र करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर : इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांना अटक करून त्यांचे पद काढून घ्यावे, या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गोपाळ लहांगे यांनी विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे व सुनील पाटील यांना दूरध्वनीवर शिवीगाळ केली होती. या संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरलदेखील झाले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. निवेदनावर ग्रामसेवक संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिचारिका संघटना, जिल्हा परिषद परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (लोकमत ब्युरो)

Web Title: Employees' Association Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.