बिटको रूग्णालयात कर्मचाऱ्यांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:25 IST2016-01-07T23:59:45+5:302016-01-08T00:25:37+5:30
असंख्य तक्रारी : परिचारिकांच्या बदलीची मागणी

बिटको रूग्णालयात कर्मचाऱ्यांची अरेरावी
नाशिक : नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी, परिचारिका ठाण मांडून असून, त्यांची अरेरावी वाढल्याने त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असल्यामुळे परिचाकरिकांसह अनेक कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी आहेत.
राजकीय आणि स्थानिक असल्याचा दबाव आणून अनेक कर्मचारी बिटको रुग्णालयातच ठाण मांडून आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून असंख्य कर्मचारी, परिचारिका येथे काम करीत असून, कामापेक्षा स्वत:ला मिरवण्यातच वेळ खर्ची घातला जात आहे. नियमित सेवा करण्याऐवजी अनेक कर्मचारी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णांनाच उपदेशाचे डोस पाजत असतात.
अनेक कर्मचारी तर प्रशासनावर राजकीय दबाव आणून याच ठिकाणी कायम राहण्यात यशस्वी झालेले आहेत, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरदेखील दबाव आणला जात असल्याची चर्चा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्येच सुरू आहे. विशेषत: परिचारिका रुग्णसेवा करण्याऐवजी खासगी कामेच करीत असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. मात्र याविषयी बोलण्यास येथील अधिकारी आणि कर्मचारीदेखील घाबरत असल्याचे बोलले जाते. विविध कर्मचारी संघटना, राजकीय पक्ष आणि वैयक्तिक ओळखीचा दबाव टाकला जात असल्याने येथील अनागोंदी कारभाराकडे कुणीही गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. येथील कामकाजाचा अनुभव अनेकदा नगरसेवकांनादेखील आला असून, रुग्णालय भेटी दरम्यान असे प्रकार नगरसेवकांच्या दृष्टीस पडले असल्याची बाब नवीन नाही. मात्र कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावले आहे. (प्रतिनिधी)