तळेगाव प्रकरणी भावनांचा उद्रेक
By Admin | Updated: October 10, 2016 00:53 IST2016-10-10T00:52:30+5:302016-10-10T00:53:37+5:30
संतप्त पडसाद : वाडीवऱ्हेत टायरची जाळपोळ; कठोर कारवाईची मागणी

तळेगाव प्रकरणी भावनांचा उद्रेक
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले. ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलने केली, तर विल्होळीनजीक बसेसची जाळपोळ करण्यात आली. संतप्त नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणी केली.सिन्नर-शिर्डी मार्गावर रास्ता रोको
बेलगाव कुऱ्हे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील घटनेचे पडसाद इगतपुरीच्या पूर्व भागात उमटले. पूर्व भागातील घोटी-सिन्नर- शिर्डी महामार्गावर एकत्र येत आज तीन तास रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. याच मार्गावरील धामणगाव, पिंपळगाव मोर तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर संतप्त जमावाने घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनीदेखील सहभाग घेतला होता. सकाळी सुरू झालेल्या रास्ता रोको निषेधासाठी पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, साकुर, पिंपळगाव घाडगा, निनावी, भरवीर, शेणीत आदि भागातील मराठा समाजातील हजारो बांधव उपस्थित होते. दरम्यान, आरोपीच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. साकुर फाट्यावरील दुकाने बंद ठेवून व टायरचे दहन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
शासनाने याबाबत तत्काळ पाऊल उचलत मराठा समाजाच्या पीडित लेकराला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी सदर ठिकाणी भेट देत जमावाला शांततेचे आवाहन केले.