सांसद ग्राम योजनेच्या संथगतीवर नाराजी
By Admin | Updated: December 5, 2015 23:35 IST2015-12-05T23:35:31+5:302015-12-05T23:35:44+5:30
आढावा बैठक : सुचवलेली कामे कागदावरच

सांसद ग्राम योजनेच्या संथगतीवर नाराजी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांसद ग्राम आदर्श योजनेंतर्गत करावयाच्या कामांची संथगती पाहता जिल्ह्यातील दोन्हीही खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर अखेरपर्यंत कामांना मंजुरी देण्याचे बजावूनही संबंधित यंत्रणा त्यात वेळकाढूपणा करीत असल्याने आजवर एकही काम सुरू होऊ शकले नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
सांसद ग्राम आदर्श योजनेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड, तर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ही दोन गावे आदर्श ग्राम योजनेसाठी सुचविले असून, या योजनेतील तरतुदीप्रमाणे गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्रमाची कामेही निश्चित झालेली आहेत. या कामांसाठी शासनाकडून स्वतंत्र निधी नसून, शासनाच्याच विविध योजनांमधून सदरची कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे त्या त्या खात्याने या कामांचे अंदाजपत्रक, प्रस्ताव तयार करून त्यांना प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत सर्वच यंत्रणांना देण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असली तरी प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या लालफीती कारभाराचा या योजनेलाही फटका बसला
आहे. (प्रतिनिधी)