अधिकाऱ्यांच्या राजकीय बदल्यांवर ‘मॅट’ नाराज?
By Admin | Updated: November 19, 2015 23:22 IST2015-11-19T23:21:40+5:302015-11-19T23:22:40+5:30
यंत्रणा कोलमडली : पाच तहसीलदारांना पुनर्नियुक्ती

अधिकाऱ्यांच्या राजकीय बदल्यांवर ‘मॅट’ नाराज?
नाशिक : मे महिन्यात सार्वत्रिक बदल्या न करता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३४ तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीने बदल्या करण्याच्या महसूलमंत्र्यांच्या निर्णयावर ‘मॅट’ने नाराजी व्यक्त करीत, त्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचे कारण दाखवित बदल्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे बदली झालेले तहसीलदार मूळ जागेवर बदलून गेल्यामुळे महसूल खात्याची राज्यात बसलेली घडी विस्कटली आहे.
महसूल अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करताना विभागीय आयुक्तांमार्फतच बदल्यांचा प्रस्ताव तयार केला जातो. त्यात निकषात व बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव महसूल खात्याकडे पाठविला जातो. महसूल खात्याकडून हा प्रस्ताव आस्थापना मंडळाकडे छाननीसाठी दाखल केला जातो. या आस्थापना मंडळात राज्याचे मुख्य सचिव व प्रधान सचिवांचा समावेश आहे. आस्थापना मंडळाकडून छाननी केल्यानंतर बदल्यांचा प्रस्ताव पुन्हा महसूल खात्याकडे पाठविला जातो व तेथून महसूल मंत्री आपल्या स्वाक्षरीने मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवतात, अशी पद्धत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये महसूल खात्याने उपरोक्त सर्व पद्धती अवलंबून महसूल खात्याने ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु त्यात काही अधिकारी बदलीस पात्र नसतानाही त्यांचाही समावेश करण्यात आला. काही अधिकाऱ्यांना फक्त चार महिने, तर काहींना एकच वर्ष झालेले असताना त्यांनाही बदलीची शिक्षा देण्यात आली. (प्रतिनिधी)