व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

By Admin | Updated: October 16, 2015 23:57 IST2015-10-16T23:56:55+5:302015-10-16T23:57:35+5:30

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

Elimination of illiterate cows ... | व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा प्रत्यय गायींबाबत प्रकर्षाने येतो. गाय दुभती न राहिल्याने कित्येक जण तिची रवानगी एकतर कत्तलखान्यात करतात वा तिला घराबाहेर तरी काढतात. आयुष्याच्या सायंकाळी व्याधीजर्जर झालेल्या या गायींची सुश्रुषा करणे किती अवघड काम असते, याची कल्पना कुणालाही यावी; पण पंचवटीतील रूपाली जोशी हे काम सतरा वर्षांपासून अव्याहत आणि निष्ठेने करीत आहेत. जोशी यांना लहानपणापासून प्राण्यांविषयी प्रेम. १९९८ मध्ये त्यांनी योगायोगाने तपोवनातील कृषी गोसेवा ट्रस्ट या संस्थेत काही दिवस काम केले. त्या गोवंशाची मनापासून करीत असलेली सेवा पाहून पुढे त्यांच्यावरच ही जबाबदारी पूर्णवेळ सोपवण्यात आली. या ट्रस्टच्या व्यवस्थापक म्हणून जोशी काम पाहत आहेत. ट्रस्टच्या गोशाळेत अडीचशे गायी, गोऱ्हे व बैल आहेत. गायीने दूध देणे बंद केल्यावर वा बैल म्हातारा झाल्यानंतर लोक त्याची रवानगी कत्तलखान्याकडे करतात किंवा त्यांना रस्त्यावर सोडून देतात. रस्त्यावर सोडलेली गुरे महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक उचलून दहा दिवस कोंडवाड्यात ठेवते. गुराचा मालक न आल्यास गुरांना या गोशाळेत पाठवले जाते. अशा गायींची रूपालीताई सेवा करतात. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गुरांची त्या स्वत:चा जीव धोक्यात घालून सुटका करतात. गोशाळेत आणून त्यांचे पालनपोषण करतात. बऱ्याच गुरांना गंभीर आजार असतो, कोणाचा सांधा निखळलेला असतो, तर कोणाला वृद्धावस्थेमुळे जागेवरून उठणेही अशक्य असते. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या आयुष्याची सायंकाळ सुसह्य करण्याचे काम जोशी करीत आहेत.
गोशाळेत येणारी गुरे भाकड असतात. त्यांच्यापासून दूध मिळत नाही. त्यांच्यावर वारंवार उपचारही करावे लागतात. समाजाने नाकारलेल्या या गुरांना रूपालीताई माया लावतात. सकाळपासूनच त्यांचे काम सुरू होते. गुरांची पाहणी करून त्यांना हवे-नको ते पाहणे, त्यांना औषधे देणे, इंजेक्शन्स-सलाइन्स देणे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे आदि जबाबदाऱ्या त्या लीलया सांभाळतात. एवढेच नव्हे, दिवसाचे चोवीस तास त्या सजग राहतात आणि कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींना वाचवण्यासाठी धाव घेतात. प्राण्यांप्रति असलेल्या प्रेमापोटीच या कार्यात रमलो आहोत. गुरे मुकी असली, तरी त्यांना भावना नीट समजतात. एखादी गाय कितीही आक्रमक झाली, तरी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवल्यास ती शांत होतेच, असा अनुभव असल्याचे जोशी सांगतात. सेवेचा हाच वसा आपण आयुष्यभर जोपासणार असल्याचाही निश्चय त्या बोलून दाखवतात.
‘समाजाकडून दुर्लक्षित गोवंशाची आपल्या हातून सेवा घडते, याचा अभिमान वाटतो. गोशाळेत आलेली गुरे मुळातच कमजोर, आजाराने ग्रासलेली असतात. अशा गोवंशाचे मरण सुसह्य करण्याचे काम आपल्या हातून घडते, याचे समाधान वाटते’, असे जोशी सांगतात.
क्षुल्लक कारणावरून माणसा-माणसामध्ये वैर भडकण्याच्या सध्याच्या काळात गुरांना माया लावणारी अशी व्यक्ती विरळीच!

Web Title: Elimination of illiterate cows ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.