महिला बालकल्याण सभापतींचा एल्गार

By Admin | Updated: February 17, 2016 00:25 IST2016-02-17T00:24:55+5:302016-02-17T00:25:07+5:30

दुय्यम स्थान : अन्यथा समिती बरखास्त करा !

Elgar of Women's Child Welfare Chairman | महिला बालकल्याण सभापतींचा एल्गार

महिला बालकल्याण सभापतींचा एल्गार

 नाशिक : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेसाठी पुष्पहाराकरिता बजेट तरतुदीकडे बोट दाखविले जाते, सभापतींच्या दालनात येणाऱ्या अभ्यागतांसाठी साधी चहापानाची सुविधा नाही, बेल दाबली तरी शिपाई तोंड दाखवत नाही, प्रत्येक कामात शासनाच्या परिपत्रकाचा बाऊ केला जातो... यांसारख्या अनेक तक्रारींचा पाढा मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वत्सला खैरे यांनी महासभेत वाचला आणि अधिकार द्या अन्यथा समिती बरखास्त करून टाका, असा एल्गार पुकारला.
महिला व बालकल्याण समितीला प्रशासनाकडून कशा प्रकारे दुय्यम वागणूक दिली जाते, याचे पत्रच वत्सला खैरे यांनी महासभेला सादर केले. खैरे यांनी सांगितले, समितीसाठी प्रशासन कोणताही कार्यक्रम देत नाही आणि समितीने काही कार्यक्रम दिला तर त्यात खो घालण्याचा प्रयत्न केला जातो. आर्थिक अडचणी सांगितल्या जातात. महिला व बालकल्याण समितीला ५ टक्के निधी राखीव असतो. शासनाचा १५ कलमी कार्यक्रम समितीमार्फत राबविला पाहिजे. परंतु त्यातील केवळ दोन-तीनच कलमांची अंमलबजावणी केली जाते. वास्तविक १० लाखां-पर्यंतच्या प्रस्तावांच्या अंमलबजावणीचे अधिकार आयुक्तांना असताना पुणे येथील महिला व बालकल्याण संचालनालयाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविले जातात. त्याची गरज नसल्याचेही खैरे यांनी निदर्शनास आणून दिले. विभागाला परसेवेतील अधिकारी देण्यात आले आहेत. परंतु त्यांच्याकडून समितीला विश्वासात न घेता परस्पर मंजुरी दिली जाते. केवळ नावापुरती असलेली समिती बरखास्त करून टाका आणि महापालिकेचा आस्थापना खर्च टाळा, असा सल्लाही उद्विग्न होत खैरे यांनी दिला. समितीमार्फत विविध उपक्रम राबविण्याची सूचना त्यांनी केली. पारंपरिक प्रशिक्षणाच्या योजना राबविण्यापेक्षा शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे निर्माण करण्यासंबंधी काही प्रशिक्षण, प्रोत्साहन देता येईल काय, यावरही विचार करण्याची मागणी त्यांनी केली. मुलींसाठी पोषण आहार, पाळणाघर चालविणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना, महिला व मुलींसाठी वसतिगृह, मिनी मार्केट, समुपदेशन केंद्र, मुलींसाठी क्रीडा महोत्सव आदि उपक्रमही खैरे यांनी सुचविले. (प्रतिनिधी)

Web Title: Elgar of Women's Child Welfare Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.