मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमधून १६ जूनला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:18+5:302021-06-09T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली असून ...

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमधून १६ जूनला एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली असून या आंदोलनाचा एल्गार कोल्हापूरमधून करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याची महिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी शासकीय विश्रागृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, नाशिकमधील सकल मराठा समाजाने तन-मन-धनाने या आंदोलनात सहभागी होऊन छत्रपतींच्या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
किल्ले रायगडावर रविवारी (दि. ६) राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार गाव, तालुकानिहाय समित्या स्थापन करून विविध जबाबदाऱ्या सोपविण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, शिवाजी सहाणे, राजू देसले, गणेश कदम, शरद तुंगार, योगेश कापसे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शरद शिंदे, अमित नडगे, विलास जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सचिन पाटील, तुषार भोसले, गुंजाळ, राहुल पाटील, सुनील बोराडे, मच्छिंद्र खुळे, श्याम खांडबहाले, विजय पाटील, भरत पाटील, काजल गुंजाळ, संदीप पवार, अतिश जाधव, भूषण तनपुरे आदी समाजबांधव उपस्थित होते.