जुन्या नाशकात अकरा ‘मौल्यवान गणेश’
By Admin | Updated: September 4, 2016 01:17 IST2016-09-04T01:17:17+5:302016-09-04T01:17:41+5:30
तयारी पूर्ण : शहरात ८५ मोठी गणेश मंडळे

जुन्या नाशकात अकरा ‘मौल्यवान गणेश’
नाशिक : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, बहुतांश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात एकूण ८५ मोठी मंडळे असून, जुने नाशिक भागात अकरा मंडळांच्या गणेश मूर्तींचा मौल्यवान गटात समावेश होतो.
सोमवारी (दि.५) गणरायाचे आगमन होत असून, गणरायाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांचा रंग गणेशोत्सवासह येणाऱ्या पुढील सणांमध्ये पहावयास मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश मंडळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, इंदिरानगर अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांची गणेशोत्सव मंडळे आहेत. शहरातील जवळपास सर्वच गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. आराससाठी लागणारे विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. दुकानांवर सजावटीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. एकूणच संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. रोषणाईच्या माळा, फुलांच्या माळांना मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक आरास करण्यावरही नागरिक भर देत आहेत. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, इदगाह मैदानाकडे नागरिकांची व विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची पावले वळू लागली आहेत. बाजारात गणरायांची नानाविध रूपे बघावयास मिळत आहे. आकर्षक रंगकाम, आकारानुसार गणेशमूर्तींच्या किमती अवलंबून आहेत. बहुसंख्य मंडळांनी मोठ्या मूर्तींची आगाऊ नोंदणी शहराबाहेरील कारागिरांकडे करून ठेवली आहे. गणरायाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी सर्वच ढोलपथके सज्ज झाली आहेत. खासगी ढोलवाल्यांकडेही बाप्पांच्या आगमन मिरवणुकीच्या बुकिंग आल्या आहेत.
फेसबुक, व्हॉट्स अॅप या सोशल साईट्स्वरही बाप्पांचे आगमन जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)