बंदोबस्तातील अकरा हजार पोलिसांनी घेतला निरोप
By Admin | Updated: September 23, 2015 22:54 IST2015-09-23T22:54:04+5:302015-09-23T22:54:47+5:30
अठरा हजार पोलीस होते तैनात

बंदोबस्तातील अकरा हजार पोलिसांनी घेतला निरोप
नाशिक : सिंहस्थ बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेले अकरा हजार पोलीस व होमगार्ड यांनी तिसऱ्या पर्वणीनंतर नाशिकचा निरोप घेतला़ त्यांच्या परतीसाठी रेल्वे व शंभर बसची सोय करण्यात आली होती़ दरम्यान, त्र्यंबकेश्वरची अखेरची पर्वणी व गणेशोत्सव यासाठी ८०० प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरात ठेवण्यात आले आहेत.
सिंहस्थासाठी संपूर्ण राज्यातून १८ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड व इतर राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले होते़ त्यामध्ये १२ पोलीस उपआयुक्त, ३३ सहायक आयुक्त, ७०० पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक तर साडेसात हजार कर्मचारी व साडेतीन हजार होमगार्डचा समावेश होता. या बंदोबस्तात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी तरु ण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी त्यांनी तिन्ही पर्वण्यांमध्ये चांगला बंदोबस्त ठेवला होता़
या कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक सेवाभाव तसेच धाडस दाखवून प्राण वाचविण्याचीही चुणूक दिसून आली़ सिंहस्थातील कामाचा ताण, २४ तास बंदोबस्त प्रसंगी होणारी गैरसोय, वरिष्ठांची शाबासकीची थाप असे गोड-कटू अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन रविवारी भरपावसात ते आपल्या मूळ ठिकाणी रवाना झाले़ (प्रतिनिधी)