अकरा कोटींच्या अंगणवाड्यांची रखडली कामे
By Admin | Updated: April 28, 2017 01:55 IST2017-04-28T01:55:44+5:302017-04-28T01:55:59+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील २६ पैकी २३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे

अकरा कोटींच्या अंगणवाड्यांची रखडली कामे
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील २६ पैकी २३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ कोटींच्या अंगणवाड्यांची कामे रखडल्याचा आरोप महिला व बालकल्याण सभापती अर्पणा वामन खोसकर यांनी केला आहे.
सभापती अर्पणा खोसकर यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. त्यात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिभा संगमनेरे काम पाहत आहेत. तसेच २६ एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या २६ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांपैकी २३ पदे रिक्त आहेत. तीनच अधिकारी नियमित असून, त्यातही एका अधिकाऱ्याला हृदयविकाराचा त्रास झाल्याने ते रजेवर आहेत. कोणत्याही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला स्वतंत्र वाहन नाही. त्यामुळे विभागाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यातच आदिवासी व बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त असताना त्यापैकी ११ कोटींच्या अंगणवाड्यांची बांधकामे रखडल्याचे आढाव्यातून उघड झाले. त्यामुळे ही प्रलंबित अंगणवाड्यांची बांधकामे त्वरित पूर्ण करण्यासाठी लवकरच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सभापती अर्पणा खोसकर यांनी सांगितले.
तसेच बैठकीत बहुतांश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कुपोषणाची माहिती आणलेली नसल्याने त्यांना समज देऊन यापुढे बैठकीला येताना कुपोषणाची माहिती सोबत आणावी, अशा सूचना महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)