अकरा कोटींचा रस्ता महिन्यातच उखडला
By Admin | Updated: July 31, 2014 00:55 IST2014-07-30T23:24:18+5:302014-07-31T00:55:16+5:30
निकृष्ट : सटाणा-देवळा रस्ता काम गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह

अकरा कोटींचा रस्ता महिन्यातच उखडला
ठेंगोडा :विंचूर : प्रकाशा राज्य महामार्गावरील सटाणा ते देवळा या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून या रस्त्याचे काम ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यावर सुरू आहे. मात्र यंदाच्या पहिल्या पावसातच ठेंगोडा गावाजवळ व इतर अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सटाणा-देवळा रस्त्यावर गेल्या वर्षी ठिकठिकाणी अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर यासंदर्भात सदर रस्त्याची दुरुस्ती व या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत लोकमतमध्ये दोनदिवसीय मालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्या वृत्ताची दखल घेऊन शासनाने सदर रस्त्याच्या अपघातप्रवण भागात उपाययोजना करण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार सदर रस्ता कामास सुरुवातही करण्यात आली.
मात्र सदर रस्ता कामातील अनियमितता व रस्ता कामात संबंधितांकडून होत असलेले मनमानी धोरण यामुळे वाहनधारकही अवाक् होत आहेत. वाटेल तेथे कामास सुरुवात करणे व सुरू असलेले काम वाटेल तेथे बंद करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी इतरत्र काम सुरू करणे अशा प्रकारे सटाणा ते देवळा रस्त्याचे सुरू आहे. रस्त्यावर साईडपट्ट्या रुंदीकरणासाठी रस्ता खोदून ठेवून काम पूर्ण न करता दुसऱ्या ठिकाणी काम सुरू करणे अशा पद्धतीने सदर काम होत असल्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर सूचना फलकाअभावी अनेकदा अपघातही घडले. मात्र संबंधित विभाग आपल्या पद्धतीनेच काम करत राहिला आहे.
मनमानी पध्दतीने सुरू असलेल्या या कामातील रस्ता अवघ्या महिन्याभरातच ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे करदात्या जनतेत व वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर कामाचे मूल्यमापन करावे, अशी मागणी उपसरपंच प्रकाश बागुल यांच्यासह परिसरातील जनतेने केली आहे.