विरगाव : सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर तरसाळी फाट्यानजीक गुरु वारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात भंडारपाडे (ता.बागलाण) येथील प्राथमिक शिक्षक पोपट नामदेव निकम (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. ते बागलाण तालुक्यातील दºहाणे (अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सटाणा येथील अन्य कामे आटोपून निकम हे सटाणा- ताहाराबाद रस्त्याने घराकडे परतत होते. यावेळी तरसाळी फाटा परिसरातील सह्याद्री धाब्याजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात समोरून येणाऱ्या ट्रकखाली ते फेकले गेल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सह्याद्री ढाब्याचे संचालक प्रभाकर रौदळ यांनी तात्काळ सटाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शुक्र वारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार असून सटाणा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरसाळी फाट्याजवळ अपघातात प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:24 IST