वीज पडून दोन मजूर ठार
By Admin | Updated: March 27, 2015 23:31 IST2015-03-27T23:31:07+5:302015-03-27T23:31:53+5:30
दहा जखमी : पावसाचा तडाखा

वीज पडून दोन मजूर ठार
पेठ : तालुक्यातील कायरे सादडपाडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात सादडपाडा शिवारात वीज पडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले असून, अन्य दहा मजूर जखमी झाले आहेत़
राजबारी - कायरे शिवारात केटी वेअर बंधाऱ्याचे काम सुरू आहे. कामावर कायरे सादडपाडा व दावलेश्वर परिसरातील मजूर काम करत असताना विजांचा अचानक कडकडाट सुरू झाला़ बचाव करण्यासाठी मजुरांनी शेजारीच असलेल्या झोपडीचा आसरा घेतला़ मात्र झोपडीवरच वीज पडल्याने सलिक कृष्णा राथड (२०) रा़ दावलेश्वर व कृष्णा सीताराम चौधरी (६५) रा़ सादडपाडा हे जागीच ठार झाले, तर सविता शिवराम राथड, सुरेखा वसंत राथड, सुनील वसंत राथड, सविता वसंत राथड, सरिता वसंत राथड, गोपाळ गोंडू गुंबाडे, सीताबाई देवराम राथड, वसंत कृष्णा राथड, नामदेव रमेश काकरे, यमुनाबाई कृष्णा चौधरी, वामन नामदेव शिंगाडे, नवनाथ रामदास पवार, माधव लक्ष्मण पवार, बेबी सीताराम शिंगाडे, मनोहर पांडुरंग जाधव यांना विजेचा तडाखा बसल्याने त्यांना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़.
पोलीस निरिक्षक व्ही़ डी़ ससे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली़
त्र्यंबकेश्वर : येथे शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली. बराच वेळ विजांचा कडकडाट मात्र सुरू होता.
वणी - वणी व परिसरात हलक्याशा पावसामुळे जनावरांचा चारा, गहु व हरभरा यांचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हलक्याशा पावसाला प्रारंभ झाला . सुमारे पस्तीस ते चाळीस मिनिटे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दुपारपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यानंतर ढगाळ हवामान व पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी अस्मानी संकटापुढे हात टेकले असून ठराविक दिवसानंतर पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
सुरगाणा - सुरगाणा व परिसरात आज संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान तुरळक प्रमाणात अवकाळी पाउस झाला.
तालुक्यातील वाद्माल सु. व करंजुल सु.येथे गारपीठ झाली. जवळपास येथे तासभर पाऊस सुरु होता. पांडुरंग वार्डे व कृष्णा भोये यांचेसह २५ ते ३० घरावरील कौले व पत्रे उडाली.त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाले. उंबरठाण, पिंपळसोंड, पळसन, खुंटविहिर, बोरीच गावठा, मालगोंदे, डोल्हारे,आम्बाठा, अलंगुण, आमदा प., बार्हे परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.गेल्या ४ - ५ दिवसापासून वातावरणात उकाडा जाणवत होता. तीन दिवसापासून येथे ३८ अंश पारा होता.
(लोकमत ब्युरो)