शहरावर विजेचे दुहेरी संकट

By Admin | Updated: July 13, 2015 23:53 IST2015-07-13T23:40:38+5:302015-07-13T23:53:38+5:30

तातडीचे भारनियमन : पंचक उपकेंद्रातही बिघाड

Electricity doubles crisis on the city | शहरावर विजेचे दुहेरी संकट

शहरावर विजेचे दुहेरी संकट

नाशिक : वीजनिर्मिती घटल्याने राज्यात सर्वत्र अचानक भारनियमन करण्यात आले. त्याचा फटका नाशिककरांनाही बसला. सुमारे दीड तासांपर्यंत भारनियमन होत नाही तोच पंचक सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नाशिकरोड परिसरासह शहरातील काही भागांत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे संपूर्ण नाशिकरोड परिसराचा वीजपुरवठा सुमारे पाच तास खंडित झाला होता.
विजेच्या मागणीत अचानक सुमारे तीन ते साडेतीन हजार मेगावॉटची मागणी वाढल्यामुळे आणि विजेची कमतरता असल्याने शहरातील सर्वच ए.बी.सी. आणि डी. गटात तातडीचे भारनियमन करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या भारनियमनामुळे नाशिककरांची गैरसोय झाली. २० मिनिटांपासून ते दोन तासांपर्यंत शहरातील विविध गटांतील ग्राहकांचे भारनियमन करण्यात आले. त्यातच नाशिकरोड येथील सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या सबस्टेशनचा पुरवठा पंचक येथील सबस्टेशनवर वळविण्यात आला. त्यामुळे पंचक सबस्टेशनवरील विजेचा भार वाढल्यामुळे तेथेही तांत्रिक बिघाड झाला आणि अवघे नाशिकरोड शहर अंधारात गेले.
कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही, याबाबत वीज वितरण कंपनीकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाणार असल्याचे महावितरणने जाहीर केले होते, मात्र ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीच्या मुहूर्तावरच शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पंचक येथील केंद्रावर दोन ट्रान्सफॉर्मरपैकी एका ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त विजेचा भार आल्यामुळे नाशिकरोड व मध्य नाशिकमधील वीजपुरवठा गायब झाला होता. ट्रॉन्सफॉर्मरवर झालेल्या बिघाडाचा फटका जेलरोड, नाशिकरोड, चेहडी, नेहरूनगर, इंदिरानगर आदि परिसरातील नागरिकांना बसला. टागोरनगर, डीजीपीनगर क्रमांक एक, वडाळागाव, इंदिरानगर आदि भागांत होणारा वीजपुरवठा दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत खंडित होता. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity doubles crisis on the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.