नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: September 24, 2016 01:45 IST2016-09-24T01:45:58+5:302016-09-24T01:45:58+5:30

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

Electricity and electricity deaths in Nashik district | नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. येवला तालुक्यातील दोघांचा, तर नांदगाव तालुक्यात एकाला जीव गमवावा लागला आहे.
येवला तालुक्यातील ममदापूर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुडघे कुटुंबीयांच्या कांद्याच्या शेतात वीज पडून एकाच कुटुंबातील दोघे जण ठार झाले, तर एक जण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कांद्याच्या वाफ्यात साठलेले पाणी काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर विजेने झडप घातली. या घटनेने ममदापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
ममदापूर परिसरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर विजेच्या कडकडाटासह चालू असलेल्या मुसळधार पावसाने सारे बंधारे ओव्हरफ्लो झाले. ममदापूर गावापासून दीड किलोमीटर दक्षिणेला शेतात वस्ती करून राहणारे गुडघे कुटुंबीय आपल्या कांद्याच्या शेतात वाफ्यात साठलेले पाणी बाजूला काढण्यासाठी शेतात आले. दरम्यान, साडेपाचच्या सुमारास विजेचा लोळ त्यांच्या अंगावर पडला. यात गुडघे कुटुंबातील संतोष जगन्नाथ गुडघे (३२), वर्षा नवनाथ गुडघे हे दोघे दीर भावजय मृत झाले. मयत वर्षा गुडघे यांचे पती नवनाथ जगन्नाथ गुडघे यांना पायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. गुडघे यांच्या शेतात वीज पडल्यानंतर अर्धातास तिघेजण शेतातच पडून होते.बाजूलाच असलेल्या भाऊबंधांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या तिघांना खांद्यावर उचलून सुमारे दीड किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यापर्यंत आणले. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतोष आणि वर्षा यांचे निधन झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान नवनाथ जगन्नाथ गुडघे (३६) यांच्यावर राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर येवला शहरातील खासगी रु ग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नांदगाव तालुक्यातील न्यू पांझण परिसरातील डोरलीपाडा वस्तीजवळ वीज पडून दत्तू साहेबराव चव्हाण (१३) याचा सायंकाळी मृत्यू झाला. सायंकाळी शाळेतून घरी परतत असताना ही घटना घडली. मृत दत्तू चव्हाण हा कर्मवीर भाऊराव पाटील साकोरा या विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. त्यांच्या मृत्यूने पांझण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Electricity and electricity deaths in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.