इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबला शिलापूर ग्रामस्थांचा विरोध
By Admin | Updated: October 5, 2015 23:04 IST2015-10-05T23:03:55+5:302015-10-05T23:04:50+5:30
ग्रामसभेचा निर्णय : मागण्या मान्य झाल्याशिवाय मंजुरी नाही

इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबला शिलापूर ग्रामस्थांचा विरोध
नाशिक : ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शिलापूर येथे होऊ घातलेले इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे कामकाज सुरू होऊ न देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थ सभेत घेण्यात आल्याने, या प्रकल्पाच्या मंजुरीवरून सुरू झालेल्या श्रेयवादात आता ग्रामस्थांनीही उडी मारली आहे.
सरपंच मीनाताई कहांडळ यांच्या अध्यक्षतेखाली मारुती मंदिराच्या सभामंडपात ग्रामसभा घेण्यात आली. त्यात शिलापूर येथील गायरान जमीन गट नंबर २२० मध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. शिलापूर ग्रामपंचायतीच्या १५ आॅगस्ट २०१३ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतरच प्रकल्पास ग्रामसभेच्या ठरावाची मंजुरी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता व तशी कल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीशी अगर ग्रामस्थांशी कुठल्याही स्वरूपाची चर्चा न करता शासनाने बळजबरीने प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. शिलापूर ग्रामपंचायतीने इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबला ना हरकत दाखला अजूनही दिलेला नाही, त्यामुळे शासन दरबारी मंजूर झालेला प्रकल्प ग्रामस्थांना मान्य नाही, असेही सांगण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्या शासनाने लेखी स्वरूपात मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बैठकीस उपसरपंच विश्वनाथ कहांडळ, माजी सरपंच माधव कहांडळ, रमेश कहांडळ, शिवाजी कहांडळ, अरुण शिंदे, रामनाथ बुवा कहांडळ, विश्वनाथ कहांडळ आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)