देवळा बसस्थानकात विजेचा खांब कोसळल्याने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:14 IST2020-01-25T22:54:38+5:302020-01-26T00:14:30+5:30
बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

देवळा बसस्थानकातील जीर्ण झाल्याने कोसळलेला विजेचा खांब व वीजवाहिन्या.
देवळा : येथील बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
अनेक वर्षांपासून सातत्याने देवळा बसस्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात होती. दोन महिन्यांपूर्वी बसस्थानकाच्या नूतन इमारत पुनर्बांधणीचे काम सुरू झाले आहे. परिवहन विभागाने जागा खाली करण्याबाबत नोटिसा दिल्यानंतर महिनाभरापूर्वी बसस्थानकातील एस.टी. कॅन्टीन,पेपर एजन्सी, कटलरी, नाभिक आदी व्यावसायिकांनी आपल्या जागा खाली करून दिल्या आहेत. बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास या पाडलेल्या इमारतीचे फरशा, पत्रे आदी जुने साहित्य परिवहन विभागाचे कर्मचारी वाहनात भरत होते. त्यावेळी शेजारी असलेला विजेचा खांब अचानक कोसळला. यामुळे जीवंत वीजवाहिन्या स्थानक आवारात उभ्या असलेल्या दुचाकींवर व जमिनीवर पडल्या. सुदैवाने तेथे कोणी उभे नव्हते. मोठा आवाज झाल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. विद्युत प्रवाह बंद झाल्यामुळे अनुचित घटना टळली. वीज वितरण कंपनीने देवळा शहर परिसरातील सर्व जुन्या- जीर्ण झालेल्या खांबांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जुन्या एसटी कॅन्टीनसमोर अनेक वर्षांपासून उभा असलेला विजेचा खांब तळाशी गंजल्यामुळे कमकुवत झाला होता. बसस्थानकाची इमारत पाडल्यानंतर निघालेल्या जुन्या फरशा या खांबाच्या आजूबाजूला रचून ठेवण्यात आल्या होत्या व त्या आधारावर हा खांब उभा होता. वितरण विभागाने वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती अशी चर्चा प्रवासी व नागरिकांमध्ये सुरू होती.
देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले गाव असून, येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. स्थानकात नाशिक, नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगारांच्या बसेसची दिवसभर ये-जा
सुरू असते. यामुळे स्थानक दिवसभर गजबजलेले
असते.