मोसमसह करंजाळीत विजेचा लपंडाव
By Admin | Updated: December 26, 2016 02:05 IST2016-12-26T02:04:39+5:302016-12-26T02:05:00+5:30
शेतकरी त्रस्त : वीजवितरण कंपनीचे आडमुठे धोरण

मोसमसह करंजाळीत विजेचा लपंडाव
द्याने : वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे मोसमसह करंजाळी खोऱ्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच परिसरात अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा जमिनीपर्यंत झुलत आहेत.
शेतकरी व नागरिक वीज कनेक्शन घेण्याची तयारी दर्शवित असतानादेखील तांत्रिक अडचणी दाखवून वेळ मारून नेत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त मोसम व
करंजाळी खोऱ्यातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची
भेट घेऊन निवेदन दिले.
दरम्यान करंजाळी येथील वीज महावितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
करंजाळी खोऱ्यातील निताणे, भुयाणे, बिजोटे, आखतवाडे, करंजाड, पारनेर मोसम परिसरातील आसखेडा, वाघळे, उत्राणे, राजपूरपांडे, द्याने आदि गावांमध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येने ग्रासल्याने शेतकरी वैतागले आहेत. आली रे...आली, गेली रे...गेली या डोंबारी खेळामुळे बळीराजाचा मेळ काही बसत नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामपूर येथील वरिष्ठ अभियंता चरणसिंग इंगळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर शेतात राहणारे शेतकरी विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. बल्ब आहे पण प्रकाश नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
करंजाळी व आसखेडा येथील कनिष्ठ अभियंत्यांना अनेक वेळेला शेतकऱ्यांनी भेटी घेऊन परिस्थिती सांगितली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भामरे यांनी पुन्हा एकदा मोसम परिसरातील सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे हे ग्राहकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने करंजाळी, पारनेर, निताणे, भुयाणे, बिजोटे, उत्राणे, द्याने, आखतवाडे आदि गावांतील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.