निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी
By Admin | Updated: January 19, 2017 00:58 IST2017-01-19T00:57:49+5:302017-01-19T00:58:02+5:30
दादा भुसे : युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी
नाशिक : आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची ‘ग्राउंडवर्क’ तयारी सुरू असून, युतीचा निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे घेतील, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि. १८) एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केले. हॉटेल गेट वे येथे झालेल्या एका उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांना शिवसेनेची तयारी नसल्याने ऐनवेळी पक्षाला उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी असून, याबाबत उद्धव ठाकरे अधिकृत सांगू शकतील. शिवसेनेने भाजपा सोबत युती करायची ठरवली तर ती सगळीकडेच करायला हवी, असे मत भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. एकीकडे युती करायची आणि दुसरीकडे विरोधात उभे राहून प्रचार करायचा ही भूमिका संयुक्तिक नसल्याचेही भुसे यांनी आवर्जून सांगितले. निवडणुकांना सकारात्मक भावनेने सामोरे जाण्याकडे पक्षाचा व पक्षश्रेष्ठींचा कल असला तरी शिवसेना पक्षात इच्छुकांची संख्या वाढली असल्याने तिकीट कोणाला द्यायचे हा प्रश्न पक्षापुढे कायम उभा आहे. काही खासगी कारणांमुळे तूर्तास निवडणुकांसाठी पूर्ण वेळ लक्ष देता येत नसले तरी मंगळवारनंतर (दि. २४) मी निवडणूक कामात आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पूर्णवेळ लक्ष घालणार असल्याचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)