कॉलेज जीएसच्या १० आॅगस्टला निवडणुका
By Admin | Updated: July 31, 2015 23:46 IST2015-07-31T23:41:14+5:302015-07-31T23:46:48+5:30
गुणवत्तेचा निकष : विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस

कॉलेज जीएसच्या १० आॅगस्टला निवडणुका
नाशिक : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्सुकता असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालायांच्या जनरल सेक्रेटरी अर्थात जीएस पदासाठीच्या निवडणुका १० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. अर्थात, या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्यासंदर्भात यापूर्वी विधी मंडळातही चर्चा झाली असली तरी याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने यंदाची निवडणूकही शैक्षणिक गुणवत्तेवर आधारितच होणार
आहे.
शहरातील विविध महाविद्यालयांमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या निवडणुका विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या अध्यादेशानुसार पुणे विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये एकाच दिवशी राबविण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी सगळ्याच महाविद्यालयांमध्ये मोर्चेबांधणी सुरू असून आहे.
या निवडणुकांसाठी सांस्कृतिक, क्रीडा, भारतीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), विद्यार्थिनी प्रतिनिधी (एलआर) आणि वर्ग प्रतिनिधी (सीआर) अशा सहा गटांतील मुख्य प्रतिनिधी या निवडणुकीस पात्र असतात. या सहा प्रतिनिधींमधून एक किंवा दोन प्रतिनिधी निवडणूक लढवितात. सामान्य निवडणुकांप्रमाणेच प्रचार, विद्यार्थी प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेऊन मते मागतात. या निवडणुकीत महाविद्यालयातील प्रत्येक वर्गातील शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल विद्यार्थ्यांना मतदान करण्याचा हक्क असतो. निवडून येणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयांचे, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणे अपेक्षित असल्याचे मत एचपीटीचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आणि बिटको कॉलेजचे प्राचार्य राम कुलकर्णी यांनी सांगितले.
गुणवत्तेवर आधारित ही निवडणूक पद्धत बदलावी आणि लोकशाही मागाने विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जावेत अशी गेल्या काही वर्षांपासून मागणी आहे. महाविद्यालयातील या निवडणुका आणि नेतृत्व लोकशाहीतील सार्वत्रिक निवडणुकींचे धडे देणारी पाठशाळा मानली जाते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी असून विधी मंडळात तशी चर्चा झाली. परंतु अद्याप निर्णय झालेला नसल्याने यंदाही गुणवत्तेवर आधारित कार्यक्रम होणार आहे.