महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी निवडणूक
By Admin | Updated: August 5, 2014 01:56 IST2014-08-05T01:20:18+5:302014-08-05T01:56:22+5:30
महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी निवडणूक

महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी निवडणूक
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची निवड येत्या सोमवारी (दि. ११) होणार आहे. त्यासाठी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावली जाणार आहे. महापालिकेतील स्थायी समितीच्या राजकारणात भाजपाला झटका बसल्यानंतर आता मनसे-भाजपा संबंधासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसाठी ही निवडप्रक्रिया ११ रोजी होणार आहे. नियमानुसार पक्षीय तौलनिक बळानुसार समितीत सदस्य नियुक्त होत असतात. त्यासाठी महापौर गटनेत्यांची बैठक घेऊन कोणत्या पक्षाच्या किती सदस्यांना संधी मिळणार याची माहिती देत असतात. त्यानंतर उमेदवारांची नावे बंद पाकिटात गटनेते महापौरांकडे निवडीसाठी बोलावलेल्या महासभेच्या वेळेपर्यंत देतात. गटनेत्यांनी दिलेल्या उमेदवारांची सदस्यपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा महापौर महासभेत करतात. गेल्यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी मनसे आणि भाजपात रस्सीखेच झाली होती. त्यात भाजपाने हे पद मिळवले होते. तथापि, आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे भाजपाने मनसेच्या विरोधात भूमिका घेण्याचे जाहीर केले होते. साहजिकच या निवडणुकीत काय होणार यावर महापौरपदाची बरीच गणिते अवलंबून असल्याने या समितीलादेखील महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)