उमराणे बाजार समितीची निवडणूक जाहीर

By Admin | Updated: January 4, 2016 23:29 IST2016-01-04T22:54:33+5:302016-01-04T23:29:33+5:30

२१ फेब्रुवारीला मतदान : २२ ला होणार मतमोजणी

Election of Umraane Market Committee | उमराणे बाजार समितीची निवडणूक जाहीर

उमराणे बाजार समितीची निवडणूक जाहीर

उमराणे : येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीची २०१६-२१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी निवडणूक जाहीर झाली असून, २१ फेब्रुवारीला मतदान, तर दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना बाजार समितीला सोमवारी (दि. ४) प्राप्त झाली.
२०१२ मध्ये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन स्वतंत्र उमराणे बाजार समिती अस्तित्वात आली. त्यानंतर दोन वर्षं प्रशासक कारकीर्द संपल्यानंतर या बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी आघाडी शासनाकडून शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन युतीचे सरकार आल्याने या बाजार समितीवर नवीन शासनाचे शासननियुक्त संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या विरोधात सत्ताधारी संचालक मंडळानेही दावा दाखल करत बाजार समितीवर कार्यरत प्रशासकीय मंडळच असावे, असे नमूद केले होते. परिणामी चार-पाच महिने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या बाजार समितीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बाजार समितीवरील प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निकाल दिला होता. त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापूर्वी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या याद्यांवर फारशा हरकती नसल्याने या याद्या कायम करण्यात आल्या. परिणामी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास क्रमप्राप्त असल्याने या बाजार समितीवर १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात सोसायटी गटातून ११ जागा आहेत. सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागास वर्गीय १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १, ग्रामपंचायत गटात ४ जागा असून, सर्वसाधारण २, अनु.जाती/जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी गटात २ जागा असून, हमाल मापारी गटात १ जागा याप्रमाणे विवरण करण्यात आले आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी येवला येथील सहायक निबंधक जितेंद्र शेळके निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. मालेगाव येथील उपनिबंधक कार्यालयातील सहायक सहकार अधिकारी एन. डी. पाटील, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Election of Umraane Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.