निवडणूक निकालाचे पडसाद

By Admin | Updated: February 25, 2017 01:19 IST2017-02-25T01:19:38+5:302017-02-25T01:19:54+5:30

इव्हीएम प्रकरणी आडगावला बंद

Election results fall | निवडणूक निकालाचे पडसाद

निवडणूक निकालाचे पडसाद

पंचवटी : प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपा उमेदवारांनी इव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याने मतदान संख्येत तफावत असल्याचा आरोप करून जमावाने दगडफेक केली़ यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारात आडगावमधील चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत़ प्रभाग एक ते तीनमध्ये झालेल्या बोगस मतदानामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्यात यावे. तसेच नागरिकांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आडगाव ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आडगावात बंद पाळला.
आमदार तथा भाजपा शहरअध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हे प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवार असल्याने या लढतीकडे सर्व शहराचे लक्ष लागले होते. दुपारी चारनंतर मीनाताई ठाकरे क्रीडासंकुलात मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिली फेरी आटोपल्यावर काहींनी इव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप करून फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे बराचवेळ गोंधळ सुरू होता़ काहीतास मतमोजणी प्रक्रिया थांबल्यानंतर आरोपकर्त्यांच्या मागणीनुसार पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमोजणी केली, मात्र मतमोजणी केंद्राबाहेर अफवा पसरल्याने नागरिकांचा मोठा जमाव जमला़
इव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले व जमावातील काहींनी घोषणाबाजी करून मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला, तर जमावातील काही संतप्त नागरिकांनी दगडफेक करीत रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या, तर काही दुचाकी पाडल्या़ त्यातच पोलीस वाहनांच्या काचा फोडल्याने परिसरात तणाव पसरू लागल्याने जमावाला शांत होण्याचे आवाहन केले गेले.  जमावाने दगडफेक सुरूच ठेवल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला़ त्यामुळे नागरिकांनी पळापळ झाली, तर काही पोलिसांवर थेट दगडफेक करीत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला़
गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही कायम होते़ आडगाव व हिरावाडी परिसरात दुसऱ्या दिवशीही काहीकाळ तणावाचे वातावरण होते़ त्यामुळे हिरावाडी तसेच आडगाव परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ इव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोळाचा व पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आडगावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी  शुक्रवारी (दि़२४) आडगाव बंद ठेवले़

Web Title: Election results fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.