निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: October 4, 2015 23:40 IST2015-10-04T23:39:50+5:302015-10-04T23:40:57+5:30
देवळा : आॅनलाइन प्रक्रियेत अडचणी आल्याने हिरमोड

निवडणूक कार्यक्रम जाहीर
देवळा : देवळा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आॅनलाइन प्रक्रियेने उमेदवारी अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणींमुळे सुरुवातीच्या चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही. यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होत असून, अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी देवळा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. दि. १ ते ८ आॅक्टोबर हा कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेला आहे. दि. १ रोजी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आयोगाने दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते क्रमांक लागत नसल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही. दि. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी असल्याने तो दिवसही वाया गेला. ३ रोजी उमेदवारी अर्जासंदर्भात माहिती आली परंतु अर्जासोबत जोडावयाचे मालमत्ता विवरण, तीन अपत्यांबाबतचे शपथपत्र, गुन्हेगारीसंदर्भातील माहिती, राखीव जागांसंबंधी असलेला माहितीचा अर्ज आदिंबाबत आॅनलाइन प्रक्रियेत माहिती न आल्याने तिसऱ्या दिवशीदेखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उमेदवार अनभिज्ञ राहिल्याने तोही दिवस वाया गेला. एकही नामांकन पत्र दाखल होऊ शकले नाही. ४ आॅक्टोबर हा रविवार सुटीचा दिवस होता.
आॅनलाइनला फाटा देत पांरपरिक पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला व अर्ज छपाईची वेळ आली तर त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. उमेदवारांना निवडणूक लढविण्यापेक्षा आपला उमेदवारी अर्ज वेळेत दाखल कसा होईल याचीच सध्या चिंता लागून राहिली आहे. असेच अडथळे जर येत राहिले तर निवडणूक आठवडाभर पुढे लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर )