निवडणूक नसलेल्या गावाला निवडणूक अधिकारी नेमले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:05 IST2020-12-24T22:24:00+5:302020-12-25T01:05:59+5:30
नांदगाव : जेवढी छोटी निवडणूक तेवढी धामधूम अधिक असते. दररोज आरोप-प्रत्यारोपांचे आपटबार फुटणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने निवडणूक ...

निवडणूक नसलेल्या गावाला निवडणूक अधिकारी नेमले!
नांदगाव : जेवढी छोटी निवडणूक तेवढी धामधूम अधिक असते. दररोज आरोप-प्रत्यारोपांचे आपटबार फुटणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने निवडणूक यंत्रणेला अत्यंत सावधानतेने रहावे लागते. परंतु निवडणूक होणारच नाही त्या गावात सहायक निवडणूक अधिकारी यांची नेमणूक केली गेली असेल तर याला प्रशासकीय फटाका म्हणावे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
निवडणुकीत शासकीय अधिकारी असो की कर्मचारी, एकदा नेमणुकीचे आदेश दिले की, कारण न सांगता कामावर हजर रहावे लागते. आदेश पाळला नाही तर मोठ्या कारवाईची शक्यता असते. परंतु निवडणूकच नाही.... आणि निवडणुकीच्या जबाबदारीचे आदेश वरिष्ठांनी दिले तर दोषी कोणाला धरायचे? हा संशोधनाचा विषय असला तरी, या आदेशामुळे महसूल यंत्रणेच्या एकंदरीत कामकाज पद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.
नांदगाव तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असताना, निवडणूक असलेल्या गावांचे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांना नियुक्तीचे पत्र तहसीलदारांनी दिले. त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले. अपवाद झाला फक्त जामदरी या गावाचा. तिथे ग्रामसेवकाची नेमणूक झाली खरी. पण ज्या गावाला निवडणूकच नाही, तिथे काय काम करायचे? असा प्रश्न पडला तर वावगे ठरू नये. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येईपर्यंत आदेशाचा कागद व्हायरल झाला होता. त्यामुळे आता प्रशासन सारवासारव करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.
...याला काय म्हणायचे?
प्रशासनातील भोंगळ कारभार हा नेहमीच संतापाचा तसाच तो मनोरंजनाचाही विषय बनत असतो. आधीच निवडणुकीसाठी ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केल्याने ग्रामसेवक संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. त्यात प्रशासनाच्या या चुकांमुळे मनस्ताप सहन करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनातील कार्यपद्धतीचा हा नमुना तालु्क्यात करमणुकीचा विषय झाला आहे. ही बाब नजरचुकीने अथवा अनावधनाने झाली की मुळातच प्रशासनाचा बुद्धीचा कस येथे कमी पडला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.