आयोगाचा अट्टहास निवडणूक अधिकाऱ्यांनी झुगारला
By Admin | Updated: November 8, 2014 00:20 IST2014-11-08T00:17:41+5:302014-11-08T00:20:02+5:30
ग्रामपंचायतीचे नामांकन छापील : तांत्रिक दोषामुळे गोंधळ

आयोगाचा अट्टहास निवडणूक अधिकाऱ्यांनी झुगारला
नाशिक : चालू महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने भरण्यास येणारे कायदेशीर व तांत्रिक अडथळे दूर न करता, त्याचा अट्टहास धरणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांनीच दणका देऊन ग्रामपंचायतीचे नामांकन छापील स्वरूपात स्वीकारण्यावरच भर दिला. दुपारी तीन वाजेपर्यंत आयोगाच्या आॅनलाइन लिंकवर विविध स्वरूपाचे दोष कायम असल्याने शनिवारीदेखील वेळ न दवडता परंपरागत पद्धतीनेच नामांकन घेण्याचे ठरविण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच जागा रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम घोषित केला आहे; परंतु आॅनलाइन नामांकनाचा आग्रह धरणाऱ्या राज्य आयोगाच्या आॅनलाइन पद्धतीत पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींचा प्रत्यक्षात समावेशच करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींची प्रक्रिया कशी पार पाडावी, असा प्रश्न राज्यातील बहुतांशी निवडणूक अधिकाऱ्यांना पडला. तशीच परिस्थिती राखीव जागांच्या बाबतीतही झाली आहे.