विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अटळ
By Admin | Updated: April 2, 2017 00:56 IST2017-04-02T00:55:49+5:302017-04-02T00:56:01+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक ५ एप्रिलला होत असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अटळ
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक ५ एप्रिलला होत असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. शिवसेना-कॉँग्रेस युती आणि भाजपा-राष्ट्रवादी आघाडी दोन्ही बाजूने सभापतिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.
शनिवारी दिवसभरात शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तसेच नेत्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावत वेगवेगळ्या चर्चा केल्याने विषय समिती सभापती निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांच्याशी जिल्हा परिषदेच्या आवारात काही काळ गुफ्तगू केल्याने शिवसेना- राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले यांनीही जिल्हा परिषदेत काही काळ हजेरी लावत पुढील राजकीय गणिते जुळविण्याबाबत चर्चा केल्याचे समजते.
तिकडे कॉँग्रेसचे माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर व कॉँग्रेसचे गटनेते यशवंत गवळी यांनीही उपाध्यक्ष नयना गावित यांच्या कक्षात बसून काही काळ चर्चा केली. शिवसेना-कॉँग्रेस-माकप बंडखोर व अपक्ष या युतीमध्ये पदांचे वाटप करण्यावरून घोडे अडल्याचे समजते. शिवसेनेला आधी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या कॉँग्रेसने आता एका सभापतिपदासाठी हट्ट धरल्याने कॉँग्रेस, माकप व अपक्षांना सोडून थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसलाच सोेबत घेण्याचा एक मतप्रवाह शिवसेनेत जोर धरू लागला आहे. त्यातच सभापतिपदांचे वाटप करताना सामाजिक समीकरणेही जपण्याची वेळ युतीवर आल्याची चर्चा आहे. शिवसेना-कॉँग्रेसचे सदस्य रविवारी (दि.२) सहलीला बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर भाजपा-राष्ट्रवादीचे सदस्य एकत्रित सोमवारी (दि.३) नाशिकच्या जवळपास सहलीला जाण्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)