डेंग्यूवरील होणारी चर्चा बेदखल

By Admin | Updated: November 21, 2014 01:16 IST2014-11-21T01:14:42+5:302014-11-21T01:16:39+5:30

डेंग्यूवरील होणारी चर्चा बेदखल

Ejected discussion on dengue | डेंग्यूवरील होणारी चर्चा बेदखल

डेंग्यूवरील होणारी चर्चा बेदखल

नाशिक : शहराला दिवसागणिक डेंग्यूचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चाललेला असताना, ज्यांच्याकडे पालकत्वाची जबाबदारी आहे अशा महापालिकेने आणि सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या महासभेने डेंग्यूला रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे; परंतु गुरुवारी झालेल्या महासभेत आयुक्तांसह आरोग्याधिकारी अनुपस्थित असल्याचे कारण पुढे सरकवत लक्षवेधी मांडणाऱ्यांनीच डेंग्यूवरील होणारी चर्चा बेदखल ठरविली आणि एका अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीवर सुमारे दीड तास खल करत गांभीर्य हरविलेल्या लोकप्रतिनिधींचे विषण्ण करणारे चित्र उभे राहिले.
एलबीटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या बैठकीमुळे महापालिका आयुक्त प्रवीणकुमार गेडाम यांची अनुपस्थिती, तर जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने आरोग्याधिकारी बुकाणे रजेवर. अशा स्थितीत गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत आयुक्तांची जागा उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी घेतली आणि महासभेत सत्ताधारी मनसेसह भाजपा सदस्याने मांडलेल्या डेंग्यूविषयक लक्षवेधीवर गांभीर्याने चर्चा होऊन प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज जाऊन पोहोचेल अशी अपेक्षा नाशिककरांना होती; परंतु प्रारंभीच मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी आयुक्त आणि आरोग्याधिकारी हजर नसल्याने नंतर विशेष महासभा बोलावण्याची विनंती केली, तर भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही चर्चा आजच घ्या अथवा नंतरची तारीख जाहीर करा, असा आग्रह धरला. त्यावर महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्व गटनेत्यांशी चर्चा करुन पुढच्या महासभेत डेंग्यूवर चर्चा करू, असे स्पष्ट केले. शिवाय आयुक्तांची तारीख घेऊन पुढील महासभा ठरवू, अशी पुस्तीही जोडली; मात्र डेंग्यूसारख्या जीवन-मरणाशी संबंध असलेल्या प्रश्नावर महासभेत चर्चेचा आग्रह विरोधकांनी धरला. प्रकाश लोंढे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्षवेधीचा नेमका अर्थ तरी कळतो काय, अशी टीपणी करत या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केले.
उद्धव निमसे यांनीही डेंग्यूच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेण्याची विनंती करतानाच उपआयुक्तांच्या समोर चर्चा करण्याची मागणी केली; परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वच्छता अभियान, जनजागृती सुरू आहे. नगरसेवकही आपल्या भागात गांभीर्याने काम करत आहेत. महापालिकेनेही त्यात सहभाग नोंदविला पाहिजे. परंतु आयुक्त व आरोग्याधिकारी हजर नसल्याने पुढच्या महासभेत त्यावर चर्चा करू, असे सांगत डेंग्यूप्रश्नी स्वत:चीही अनास्था महापौरांनी दाखविली.
डेंग्यूविषयक लक्षवेधीचा प्रश्न बाजूला पडल्यानंतर सदस्यांनी मात्र एका अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीवर दीड तास खल केला; परंतु चर्चेअंती सदर विषयावरही निर्णय होऊ शकला नाही. उपआयुक्त या रिक्त पदावर मालेगाव महापालिकेतील सहायक आयुक्त विजय पगार यांची प्रतिनियुक्ती करण्याचा विषय तहकूब ठेवावा लागला. (प्रतिनिधी)

Web Title: Ejected discussion on dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.