लोकप्रतिनिधींची आंदोलने बेदखल
By Admin | Updated: October 10, 2015 22:32 IST2015-10-10T22:17:45+5:302015-10-10T22:32:38+5:30
बोगद्याचा प्रश्न : राष्ट्रवादीकडून मात्र अजब समर्थन

लोकप्रतिनिधींची आंदोलने बेदखल
इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील बोगदा पोलिसांनी वाहतुकीसाठी अचानक बंद केल्यानंतर त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याची दखल घेत राजकीय पक्ष इतकेच नव्हे आमदारांनी आंदोलने केली; परंतु गेल्या तीन ते चार महिन्यांत ही आंदोलने झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या निमित्ताने या विषयांवरील लक्ष हटले आणि पोलिसांनी राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींची आंदोलने बेदखल केली आहेत. त्यामुळे समस्या कायम आहेत. कुंभमेळ्यानंतर आमआदमी पार्टीने या ठिकाणी आंदोलन करून पुन्हा या विषयाला उचल दिली असताना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने मात्र बोगदा बंदचे समर्थन केल्याने नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.
महामार्गावर उभारलेल्या अतिभव्य उड्डाणपुलाखालून दोन्ही ठिकाणच्या समांतर रस्त्यांना जोडण्यासाठी बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील बोगदा होता आणि तेथून गोविंदनगर आणि मुंबई नाक्याकडे जाणे सुलभ होते; परंतु एका सकाळी अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पोलिसांनी अडथळे टाकून वाहतुकीसाठी हा बोगदा बंद केला. याठिकाणी केवळ पादचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. नागरिकांनी या विषयावर संताप व्यक्त केल्यानंतरही त्यावर पोलीस खात्याने दखल न घेता आडमुठेपणा कायम ठेवला. त्यामुळे राजकीय पक्षांनी या विषयाला हात घातला. मनसे, भाजपा आणि आम आदमी पार्टीने यावर आंदोलने केली. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील मध्यस्ती केली, परंतु पोलीस प्रशासन कोणालाच जुमानत नसल्याचे आजवर बोगदा बंद ठेवून सिद्ध केले आहे.
नागरिकांनी तर दोन ते तीन वेळा मध्यरात्री बोगद्याची अडथळे दूर करून बोगदाच वाहतुकीला खुला केला, परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. पोलिसांनी जबरदस्तीने बोगद्यासमोर अडथळे आणून ठेवले. आॅगस्ट महिन्यापासून कुंभमेळ्यातील स्नानासाठी साधू-महंत दाखल झाल्यानंतर साऱ्यांचेच लक्ष विचलित झाले आणि बोगद्याचा विषय मागे पडला. आता पुन्हा आम आदमी पक्षाने या विषयाला हात घातला आहे. तथापि, अगोदर आमदारांना न जुमानणारी पोलीस यंत्रणा आम आदमीला कितपत मोजणार हा प्रश्नच आहे. तशातच, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने अचानक पोलिसांचा पुळका घेत बंद बोगद्याचे फायदे दाखविणारे फलक लावल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय पक्ष हा लोकभावनेबरोबर राहणे अपेक्षित असताना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने मात्र सरकारी यंत्रणेची भलामण सुरू केली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वेक्षणाचे काय झाले : नागरिकांचा प्रश्न
इंदिरानगर येथे उड्डाणपुलाखालील बोगदा पोलिसांनी बंद केल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना विश्वास घेण्याच्या नावाखाली या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. या सर्वेक्षणातून बोगद्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. या सर्वेक्षणाचे काय झाले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.