आठ हजार क्विंटल बियाणे पडून

By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-01T22:19:56+5:302014-07-02T00:30:53+5:30

आठ हजार क्विंटल बियाणे पडून

Eight thousand quintals of seed fall | आठ हजार क्विंटल बियाणे पडून

आठ हजार क्विंटल बियाणे पडून

 

सुनील थोरात

सिन्नर
जून महिना उलटला आहे. पावसाचे वातावरणही दिसत नाही. केवळ जोरदार झटक्याचा वारा सुटल्याने हे दुष्काळाचे लक्षण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे. बाजारपेठेत शुकशुकाट असून, तालुक्यात विविध पिकांचे विक्रीसाठी उपलब्ध झालेले सुमारे आठ हजार क्विंटल बियाणे, तर सुमारे बारा हजार ३३८ मेट्रिक टन खते विक्रीअभावी पडून आहेत. खते, बी-बियाणे व औषधांच्या विक्रीतून होणारी कोट्यवधींची उलाढाल पावसाअभावी ठप्प झाली आहे.
दुष्काळाची चिन्हे वाढल्याने अन्य दुकानांतील खरेदीवरही त्याचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. तालुक्यात ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र हे नियोजन कोलमडले असून, भात, भूईमुगासह अन्य कडधान्याच्या पिकांच्या पेरणीचा कालावधी जवळपास संपला आहे. त्यामुळे या पिकांच्या पेरण्या अशक्य असून, केवळ बाजरी, मका, सोयाबीन आदि पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे, तर कृषी विभागाकडून हा कालावधी २१ जुलैपर्यंत सांगितला जात आहे. साधारण आषाढी एकादशीपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तर सर्वच पिकांच्या पेरा होऊ शकतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कडधान्य गटातील मठ, मूग, तूर, कुळीद, उडीद तेलबिया वर्गातील भूईमूग, सोयाबीन, तीळ, हौरी, खुरसणी यांच्या उत्पादनात लांबलेल्या पावसाने व उशिराच्या पेऱ्यामुळे मोठी होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामातील तृणधान्य पिकांमधील बाजरी, मका, खरीप ज्वारी व नागली यापैकी बाजरी व मका पिकांची पेरणी १५ ते २० जुलै कालावधीत होऊ शकते. त्यामुळे या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. सपाटून पाऊस झाल्यास भाजीपालावर्गीय व नगदी पिकांतून उत्पादनवाढीसाठी शेतकरी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापुढेही पावसामध्ये सातत्य राहिले तरच उत्पादन हाती लागेल अन्यथा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाने केलेले पिकांच्या पेरणीचे नियोजन. त्यात तृणधान्य पिकांतील बाजरी पिकाच्या पेरणीचा २० हजार २५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, मका १९ हजार २५०, सोयाबीन- आठ हजार या पिकांची पेरणी १५ ते २० जुलैपर्यंत झाल्यास उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले. मात्र भूईमूग- चार हजार १५०, खरीप ज्वारी ५०० हेक्टर, नागली ५०, तूर, मूग, मठ व कुळीद- प्रत्येकी एक हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल, खुरासणी - प्रत्येकी १०० हेक्टर, ऊस- ८५० हेक्टर या पिकांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. कापूस पिकालाही अधिक कालावधी लागत असल्याने त्याच्या एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणेही शक्य नसल्याचा अंदाज आहे. यापुढील नियोजन पावसाच्या हाती असल्याने तो पडावा म्हणून सगळचे आराधना करू लागले आहेत.

Web Title: Eight thousand quintals of seed fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.