सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह राज्यात आठ ठिकाणी युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:23 IST2018-01-18T15:23:37+5:302018-01-18T15:23:42+5:30

सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह राज्यात आठ ठिकाणी युनिट
नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन हा उपक्रम राबविला जातो. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह आठ शहरांत युनिट स्थापन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रस्ताव राज्य कुटुंब कल्याण विभागाने तयार केला असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर नूतनीकरण, मनुष्यबळ, साहित्य आणि साधनसामग्रीचा पुरवठा केला जाईल. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर येथे अतिदक्षता सेवा युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार सुमारे सहा ते आठ खाटांचे युनिट असेल. याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील.
नाशिक शहरातील सुयश रुग्णालयात बाळंतपणाच्या वेळी अतिदक्षतेच्या सेवा पुरविण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. अशाच प्रकारची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कामाला सुरुवात होईल.