प्रभागरचनेवर आठ हरकती
By Admin | Updated: October 22, 2016 01:47 IST2016-10-22T01:45:58+5:302016-10-22T01:47:51+5:30
मंगळवारपर्यंत मुदत : ९ नोव्हेंबरपर्यंत होणार सुनावणी

प्रभागरचनेवर आठ हरकती
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत आठ हरकती प्राप्त झाल्या असून, मंगळवार (दि. २५) पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी ४ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त हरकतींवर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते, परंतु आयोगाने त्यात सुधारणा करत सुनावणीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे.
आरक्षण सोडतीच्या दिवशीच महापालिकेचे प्रारूप प्रभाग घोषित झाले होते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा १० आॅक्टोबरला करण्यात आली होती. त्यानंतर १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेकडे आतापर्यंत आठ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग १७ मधून सेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांनी कॅनॉलरोडवरील झोपडपट्टीला आक्षेप घेत नैसर्गिक हद्दीचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. सदर झोपडपट्टी ही प्रभाग २० ऐवजी १७ मध्ये समाविष्ट करण्यास त्यांनी विरोध केला आहे. माजी नगरसेवक संजय भालेराव यांनीही प्रभाग १७ मधून वगळलेल्या भागाबाबत आक्षेप घेत भौगोलिक सलगतेच्या दृष्टीने त्यांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. नितीन चिडे यांनी नवले चाळीचा समावेश प्रभाग २१ मध्ये करण्याची सूचना केली आहे. सेनेच्या माजी नगरसेवक सत्यभामा गाडेकर यांनी वालदेवी नदी व रेल्वे गेट हे अडथळे असताना व त्याबाजूला जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसताना चुकीच्या पद्धतीने प्रभाग २२ ला जोडण्यात आला आहे.
सदर भाग हा प्रभाग १९ ला जोडण्याची सूचना गाडेकर यांनी केली आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष अजिंक्य साने यांनी प्रभाग १३ मध्ये सारडा सर्कल ते खडकाळी चौक या रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग व त्यातील काही वस्त्या बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार केली आहे. अस्तित्वात नसलेले रस्तेही दाखविण्यात आल्याचे साने यांनी स्पष्ट केले आहे. साने यांच्याबरोबरच परेश लोथे यांनीही हीच तक्रार करत काही भाग प्रभाग १४ मध्ये समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. करणसिंग रामसिंग बावरी यांनी प्रभाग १५ हा परिसर गावठाण भागात येत नसतानाही तीन सदस्यीय तर प्रभाग १४ हा सर्व परिसर गावठाण भागात येऊनही तो चार सदस्यीय करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदविला आहे. कौस्तुभ परांजपे यांनी तर संपूर्ण प्रभागरचनेलाच हरकत घेतली आहे.
हरकती दाखल करण्यासाठी दि. २५ आॅक्टोबरपर्यंत मुदत असून, शनिवार व रविवारी सुटी आहे. त्यामुळे सोमवारी-मंगळवारी आणखी हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)