आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By Admin | Updated: September 17, 2016 00:46 IST2016-09-17T00:46:41+5:302016-09-17T00:46:49+5:30
महागड्या सायकल : तिघे अल्पवयीन मुले ताब्यात

आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या परिसरासह वेगवेगळ्या ठिकाणाहून सोसायटीत लावण्यात आलेल्या महागड्या सायकल चोरणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १४ नामांकित कंपनीच्या महागड्या सायकल तसेच अन्य गुन्ह्यातील एक स्विफ्ट डिझायर कारसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.
अंबड तसेच परिसरातील सोसायटी व पार्किंगच्या जागी असलेल्या महागड्या सायकल चोरी करून त्या विकणाऱ्या संशयितांमध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सदर अल्पवयीन मुले ही इयत्ता नववीत व दहावीत शिक्षण घेत आहे. यापैकी एका मुलास आई, वडील नसल्यामुळे त्यास शालेय जीवनामध्ये चांगल्याप्रकारे मार्गदर्शन न झाल्याने वाईट वळणाला लागून त्याने सायकल चोरीचे कृत्य केले, तर दुसऱ्या एका मुलाने त्याचे आई-वडिलांशी भांडण झाल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी
सांगितले.
या अल्पवयीन मुलांनी महागड्या सायकली चोरून त्या अन्य व्यक्तीला कमी पैशांमध्ये विकल्या होत्या, असेही पोलिसांनी सांगितले. या तपासात पोलीस निरीक्षक संजय बांबळे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, तुषार चव्हाण, दत्तात्रय विसे आदिंसह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)