चुकीने झाडलेल्या गोळीने सप्तशृंगगडावर आठ जखमी
By Admin | Updated: October 12, 2016 06:26 IST2016-10-12T06:26:04+5:302016-10-12T06:26:04+5:30
विजयादशमीच्या सोहळ््यावेळी सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलचा ट्रिगर दाबला जाऊन त्यातून सुटलेल्या गोळीच्या छऱ्याचे तुकडे लागून ८ जण जखमी

चुकीने झाडलेल्या गोळीने सप्तशृंगगडावर आठ जखमी
वणी/सप्तशृंगगड : येथे विजयादशमीच्या सोहळ््यावेळी सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलचा ट्रिगर दाबला जाऊन त्यातून सुटलेल्या गोळीच्या छऱ्याचे तुकडे लागून ८ जण जखमी झाले.
त्यात मंदिर प्रशासन व न्यासाचे चार कर्मचारी व चार ग्रामस्थ आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता गडावर ही घटना घडली. नवरात्रौत्सवाच्या सांगतेनंतर इतर विधी सुरू असताना यज्ञकुंडातील होमामध्ये बोकडाचे मुख अर्पण करण्याची प्रती वर्षांची परंपरा असून, मनोज वाघ कुटुंबीयांकडे हा मान आहे.
प्रकोप शांत करण्यासाठी बोकडाचे मुख अर्पण करण्याचे आयोजन विजयादशमीदिनी गडावरील पंचविसाव्या पायरीजवळ आखले होते.
दत्तमंदिराजवळील उंबराच्या झाडाजवळ व परिसरात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मुख अर्पण करण्यासाठी बोकड गडावर आणण्यापूर्वी प्रचंड गर्दी आवरता आवरता सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असताना सैन्यदलातील सेवानिवृत्त व न्यासाच्या सुरक्षारक्षकाच्या पथकात कार्यान्वित श्रावण चव्हाण (४८) हे विधीपूर्ततेची प्रतीक्षा करत रायफलने सलामी देण्याच्या तयारीत असताना जमिनीलगत तोंड असलेल्या रायफलच्या ट्रीगरवरील बोट चव्हाण यांच्याकडून दाबले गेल्याने रायफलीमधून गोळी बाहेर पडली व ती जमिनीवरील फरशीवर आदळल्याने गोळीच्या छऱ्याचे तुकडे होऊन ८ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
रायफलने हवेत फैरी झाडून सलामी देण्याची येथे दसऱ्याला परंपरा आहे. मात्र त्याचे नियोजन व नियंत्रण यांच्यात समन्यव नसल्याने सदर प्रकार घडला असून, संबंधित सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)