मालेगावसह जिल्ह्यात ईद उत्साहात
By Admin | Updated: June 27, 2017 01:31 IST2017-06-27T01:30:56+5:302017-06-27T01:31:14+5:30
नाशिक : पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र)निमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी नमाजपठण करण्यात आले.

मालेगावसह जिल्ह्यात ईद उत्साहात
नाशिक : पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र)निमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी नमाजपठण करण्यात आले. मालेगाव, येवला, सिन्नर, चांदवड, विंचूर, कळवण व इगतपुरीसह विविध भागात मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील पोलीस कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. मुख्य इदगाह येथे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी बयाण केले. यावेळी मुस्लीम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले. ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. सोमवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर मुख्य नमाज व दुवा पठण करण्यात आले. यावेळी मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी बयाण करताना सांगितले की, देशात राष्ट्रीय एकात्मता व शांती राहिली पाहिजे, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याचे गरजचे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष असले तरी प्रभारी अधिकाऱ्यांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शहरातील कालिकुट्टी, सोनापुरा कब्रस्तान, सेंट्रल इदगाह ग्राउण्ड, शिया कब्रस्तान, जुमा मशीद, हुसेनी मशीद, मन्सुरा महाविद्यालय, आयेशानगर कब्रस्तान, गोल्डननगर मिल्लत मदरसा, खलीलशेठ मळा, चिंचमळा, ब्राह्मणपाडा, इस्जतेमानगर, मुफ्ती-ए-आजम इदगाह, भिकन शहा दर्गा, कल्लू स्टेडियम, खानका मशीद आदि ठिकाणी नमाज अदा करण्यात आली.
मालेगावी मुख्य नमाजनंतर मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा राष्ट्रीय एकात्मता व शांतता समिती, महसूल विभाग व पोलीस दलाकडून अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, बाजार समितीचे चेअरमन प्रसाद हिरे, केवळ हिरे, हरिश मारू आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन झाले. हिंदू बांधवांकडून मुस्लीम बांधवांना ईदच्या गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. नमाजसाठी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व सरबतची व्यवस्था हिंदू बांधवांनी केली होती. येथील मोसमपुलावर मुस्लीम बांधवांचे स्वागत करण्यात येत होते. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कवायत मैदानावर धातुशोधक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली तसेच मनोऱ्यांवरून विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.
मनमाडला उत्साह
मनमाड : शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. इदगाह मैदानावर मौलानांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाजपठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मौलानांचा सत्कार करून ईदच्या शुभेच्छ्या देण्यात आल्या. शहरातील सर्व मशिदींच्या मौलानांसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने हजर होते. ईदनिमित्त मुस्लीम वस्त्या रंगरंगोटी व विद्युत रोषनाइने झगमगून गेल्या आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यामधील रोजे पूर्ण झाले. शहर वपरिसरातील मुस्लीम बांधवांनी महिनाभराचे रोजे धरले होते. या महिनाभराच्या कालावधीत रोज रात्री मशिदींमधे बडा नमाजचे आयोजन करण्यात आले होते. रमजान महिन्यादरम्यान विविध संस्था व संघटनांच्या वतीने सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करून आपापसातील स्रेहभाव वृद्धिंगत करण्यात आला. शहरातील विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व समाजबांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मालेगाव येथील पोलीस कवायत मैदानावर रमजान ईदनिमित्त नमाजपठण करताना मुस्लिमबांधव.