बंजारा समाजाच्या मागण्या पूर्णत्वासाठी प्रयत्न : राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:39+5:302021-09-21T04:16:39+5:30
नांदगाव : गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी धडपड सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेऊन त्या माध्यमातून समाजाला उच्च पातळीवर ...

बंजारा समाजाच्या मागण्या पूर्णत्वासाठी प्रयत्न : राठोड
नांदगाव : गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी धडपड सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेऊन त्या माध्यमातून समाजाला उच्च पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केले.
येथील गुप्ता लॉन्सवर आयोजित समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास कांदे उपस्थित होते.
गोर बंजारा समाजाच्या पंचवीस मागण्या असून वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याठिकाणी बंजारा समाज बांधवांचे तांडे आहेत त्याठिकाणी आमदार कांदे यांनी सेवालाल महाराजांच्या मूर्ती देण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर तालुक्यातील २७ तांड्यावर वाचनालय सुरू करून किमान ५० हजारांची पुस्तके द्यावीत जेणेकरून आमचा तरूण लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांत यशस्वी होईल. हा समाज सर्वात गरीब आहे. तांड्यावर रस्ते, पाणी, वीज व इतर समस्या ही आहेत. त्यासुविधा या समाजाला देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राठोड यांनी आमदार कांदे यांना केले. माझ्यावर आरोप झाल्या नंतर स्वत:हून राजीनामा देणारा मी पहिला मंत्री आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राठोड यांच्या शोभायात्रेत गोर बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य करून त्यांचे स्वागत केले.
इन्फो
सेवालाल महाराजांचे मंदिर उभारणार
आमदार सुहास कांदे यांनी सांगितले, सेवालाल महाराजांचे मंदिर बांधून दिले जाईल. तसेच लोकसंख्या बघून त्या त्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. तांड्यावर मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अंजुम कांदे, सभापती सुभाष कुटे, तेज कवडे, विलास आहेर, संगीता बागुल, बंडू पाटील, भाऊसाहेब हिरे, दत्तात्रय निकम, बाळासाहेब आव्हाड, किरण देवरे, गुलाब भाबड, कैलास भाबड, राजेंद्र देशमुख आदि होते.
फोटो - २० नांदगाव राठोड
नांदगाव येथे बंजारा समाजाच्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री व आमदार संजय राठोड. समवेत व्यासपीठावर आमदार सुहास कांदे यांचेसह बंजारा समाजाचे पदाधिकारी.
200921\20nsk_50_20092021_13.jpg
फोटो - २० नांदगाव राठोड नांदगाव येथे बंजारा समाजाच्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री व आमदार संजय राठोड. समवेत व्यासपीठावर आमदार सुहास कांदे यांचेसह बंजारा समाजाचे पदाधिकारी.