शिक्षण मंडळ कारभाराची लक्तरे
By Admin | Updated: March 18, 2015 23:10 IST2015-03-18T23:10:40+5:302015-03-18T23:10:56+5:30
प्रशासनाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप : साडेतीन तासांच्या चर्चेनंतर मूळ सेवेत पाठवणी

शिक्षण मंडळ कारभाराची लक्तरे
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारनाम्यांनी वादग्रस्त ठरलेल्या मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या कारभाराची लक्तरेच संतप्त सदस्यांनी महापालिकेच्या महासभेत टांगली. सदस्यांनी पुराव्यांनिशी गंभीर आरोपांच्या फैरी झाडत कुंवर यांच्या कारभाराचा पंचनामा केला. तब्बल साडेतीन तासांच्या वादळी चर्चेनंतर अखेर सभागृहाचा कल लक्षात घेता प्रशासनाधिकाऱ्यांची मुदत संपल्याचे कारण दर्शवित त्यांची परत मूळ सेवेत रवानगी करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केला.
महापालिकेची महासभा प्रामुख्याने शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती कुंवर यांच्या कारनाम्यांनीच गाजली. विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी प्रारंभी शिक्षण मंडळात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या निर्णयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गणवेश खरेदीबाबत सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल बडगुजर यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी कुंवर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपली पहिलीच महासभा असल्याने उत्तर देताना गोंधळ उडाल्याचे सांगत सभागृहाची माफी मागितली. परंतु या माफीने समाधान न झाल्याने बडगुजर यांनी मागील महासभेत झालेल्या चर्चेचे रेकॉर्डिंगच मोबाइलवरून सभागृहाला ऐकविले. सदर रेकॉर्डिंग ऐकवताना महापौर आणि बडगुजर यांच्यात खटकेही उडाले.
बडगुजर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मनपा सेवेत रुजू करून घेणे, पोषण आहारासाठी निधी मागताना खोट्या स्वाक्षऱ्या केल्याबद्दल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने प्रशासनाधिकाऱ्याला पाठविलेले पत्र यासह विविध विषयांवर मत मांडले.