खाद्यतेल कडाडले
By Admin | Updated: August 19, 2016 00:52 IST2016-08-19T00:48:18+5:302016-08-19T00:52:59+5:30
डाळी महागच : साखरेचे भाव चढे, भाज्यांचाही तोरा कायम

खाद्यतेल कडाडले
नाशिक : सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा होत असताना ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत बुधवारी प्रति १५ लीटरच्या डब्यामागे ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत तेलाच्या किमतीत आतापर्यंत प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सणाच्या काळात स्वयंपाक घरातील गोडवाही कमी झाला आहे. गेल्यावर्षी ३० ते ३१ रुपये प्रतिकिलो असलेली साखर ४० रुपयांपर्यंत गेली आहे. डाळीच्या किमती घसरल्याचे बोलले जात असले तरी ग्राहकांना सव्वाशे रुपयांहून अधिक दराने तूरडाळ विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींसमोर घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक व विविध क्षेत्रातील कामगार आदिंसह सर्वसामान्य कुटुंबीयांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, तूरडाळ महागाईमुळे आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले आहे. त्यासाठी तूरडाळीचे वितरण स्वस्त धान्य दुकानांद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्यापही ग्राहकांना सहजरीत्या स्वस्त डाळ उपलब्ध होऊ शकत नाही. तर घाऊक बाजारातही तूरडाळीचे भाव १० ते २० रुपयांनी घसरल्याची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्ष ग्राहकाला अजून १२५ ते ते १३० रुपये किलो डाळ विकत घ्यावी लागत आहे. अशा स्थितीत सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असल्याने नेमके स्वस्त काय झाले, असा सवाल गृहिणींनी केला आहे. स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींकडून वरणाऐवजी इतर पदार्थांच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. मात्र बाजारातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दरही अजून चढेच असल्याने ठरलेल्या अंदाजपत्रकात घरखर्च चालविताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)