‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ कार्यशाळा

By Admin | Updated: October 21, 2015 22:40 IST2015-10-21T22:39:49+5:302015-10-21T22:40:53+5:30

‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ कार्यशाळा

Eco-Friendly Akash Kandel Workshop | ‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ कार्यशाळा

‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ कार्यशाळा

नाशिक : आपल्याकडील अनेक परंपरा लोप पावत चालल्या असून कला, परंपरा, संस्कृती जोपासली जावी यांसह पर्यावरणाचे संवर्धन होणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याने पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार (दि.११) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात करण्यात आले होते.
कार्डशीटचे वेगवेगळे आकार, आकर्षक रंगांचे कागद, सोनेरी तसेच आकर्षक रंगसंगती असलेल्या झिरमिळ्या अशा साहित्यापासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माझं ग्रंथालयाच्या बालविभागातील ११० विद्यार्थ्यांनी ‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ कार्यशाळेत सहभाग नोंदवत आकर्षक आकाशकंदील बनविले होते.
या कार्यशाळेत ‘सृष्टी’ या संकल्पनेतून विविध पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविले होते. कार्यशाळेत सहभागी चिमुकल्यांना प्रशांत परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. परदेशी यांनी ‘सृष्टी’ ही संकल्पना उलगडून सांगताना सृष्टी ही निरंतर चाललेली रासायनिक प्रक्रिया असून, याला विरोध म्हणजे पर्यावरणाच्या ऱ्हासाला हातभार लावण्यासारखे असल्याने आजच्या पिढीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणेशोत्सवाअंतर्गत शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याच्या मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने ‘इको फ्रेंडली आकाशकंदील’ ही कार्यशाळा राबविण्यात आली असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे यांनी यावेळी सांगितले. आजच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी बाल विभागाच्या सभासदांकडून सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय उपस्थिताना करून देणे, असे वेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही रानडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन मल्हार क्षेमकल्याणी या विद्यार्थ्याने केले. या कार्यशाळेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. शिंदे, नेहा खरे, स्वाती बोरवाडकर, तन्वी देवडे, संगीता राजपाठक, स्वाती दीक्षित, प्रशांत परदेशी, सुदेश तांबट आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Eco-Friendly Akash Kandel Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.