पीक पाहणी ॲपला सर्व्हर डाऊनचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:33+5:302021-09-02T04:29:33+5:30
वणी : शेतकऱ्यांच्या पीक पाहणी व पीकपेरा नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ॲपवर ऑनलाईन पीकपाहणी व पीकपेरा ...

पीक पाहणी ॲपला सर्व्हर डाऊनचे ग्रहण
वणी : शेतकऱ्यांच्या पीक पाहणी व पीकपेरा नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ॲपवर ऑनलाईन पीकपाहणी व पीकपेरा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर महसूल विभागाची डोकेदुखी वाढली आहे. १५ ऑगस्टपासून ऑनलाईन पीकपाहणी व पीकपेरा नोंदीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असा यासाठीचा कालावधी आहे. या कालावधीत पीकपाहणी व पीकपेरा नोंदणी करणे बंधनकारक व अपेक्षित आहे. हा डाटा तलाठी यांच्याकडे जातो. या प्रक्रियेत शेतीमालक कोण ? कोणती पिके शेतजमिनीत आहेत? जमीन कसणाराचे नाव व गट क्रमांक, गावाचे नाव व इतर तत्सम माहिती संकलित झाल्यानंतर कर्ज प्रकरण करण्यासाठी या सर्व डाटा वापरात येतो. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी समाधानकारक पीकपाहणी नोंदणी तांत्रिक अडचणीमुळे झालेली नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर शासनाने ॲप विकसित करून ते कार्यान्वित केल्यास शेतकरीवर्गाची रखडपट्टी होणार नाही व पीकपाहणी व पीकपेरा नोंदणीची कामेही सुलभ होतील अशी मागणी शेतकरी वर्गाची आहे.
----------------
अकारण मन:स्ताप
दिंडोरी तालुक्यात १५६ खेडे पाडे आहेत. एका खेड्यात ५०० खातेदार अंदाजे गृहित धरली तरी मोठा आकडा समोर येतो. दरम्यान, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा कारभार या एका ॲपवर चालतो. त्यामुळे सर्व्हर डाऊन राहणे, नेट न चालणे, रेंज न मिळणे अशा प्रकारांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पीकपाहणी व पीकपेरा करता येत नाही. अकारण मन:स्ताप होतो तो वेगळा. कारण तासनतास शेतीक्षेत्रात स्वतःचा फोटो काढून शेती क्षेत्रातील पिकांची माहिती संकलित करण्यात येते.