कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान
By Admin | Updated: March 22, 2015 00:27 IST2015-03-22T00:26:37+5:302015-03-22T00:27:58+5:30
कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान

कृषिमंत्र्यांनी टोचले पालकमंत्र्यांचे कान
नाशिक : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल (दि.२१) शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे कारण यंत्रणेने देऊन आपल्याला येथे येऊ दिले नाही, असा खुलासा केला. यावेळी अधिवेशन सुरू असल्याने काही घोषणा अथवा मदत जाहीर करता येणार नाही, असे सांगणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी नाही मदत तर शेतकऱ्यांना निदान आश्वस्त तरी करा, असे सांगत कान टोचल्याचा प्रकार वनसगाव येथील सभेत घडला.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना नाशिक जिल्ह्णातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तत्काळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी निफाड तालुक्यातील वनसगाव, सारोळे यांसह काही गावांत पाहणी दौरा केला. यावेळी वनसगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी राधामोहन सिंग यांच्यासह महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला.
त्यावेळी एकनाथ खडसे यांनी अधिवेशन सुरू असल्याने आपल्याला येथे मदत अथवा काही घोषणा करता येणार नाही. नाही तर हक्कभंग होईल. मात्र, शेतकऱ्यांना सवलत व कर्जमाफीबाबत आवश्यक ती कार्यवाही करता येईल. तोच धागा पकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला आता काही मदत जाहीर करता येणार नाही. आपणही गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत आहोत. संघर्षातूनच मोठे झाले आहोत. मागील वेळी सिन्नरवरून आपण येथे येणार होतो. मात्र, प्रशासन व पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे सांगत आपल्याला येऊ दिले नाही. म्हणून आपण आज आल्याचे सांगितले.
त्याचवेळी राधामोहन सिंग यांनी मदत नाही, तर निदान शेतकऱ्यांंना आश्वास्त तर करा, असे सांगितल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना लवकरच नुकसानीबाबत आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)