श्राद्धकर्माच्या पितृपंधरवड्यास प्रारंभ
By Admin | Updated: September 28, 2015 23:34 IST2015-09-28T23:34:11+5:302015-09-28T23:34:53+5:30
श्राद्धकर्माच्या पितृपंधरवड्यास प्रारंभ

श्राद्धकर्माच्या पितृपंधरवड्यास प्रारंभ
नाशिक : दिवंगत झालेल्या पूर्वज-पितरांचे स्मरण करून देणाऱ्या आणि श्राद्धकर्माच्या माध्यमातून पितरांना आवाहन करत त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेणाऱ्या पितृपंधरवड्यास आजपासून (दि.२८) प्रारंभ झाला. दि. १२ आॅक्टोबरपर्यंत घरोघरी श्राद्धविधी चालणार असून, पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नसल्याने बाजारपेठेतील उलाढालही मंदावणार आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभपर्वकाळातही श्राद्धविधी करण्यात कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा शास्त्र अभ्यासकांनी दिला आहे.
सोमवार, दि. २८ सप्टेंबरपासून भाद्रपद कृष्ण प्रतिपदेस महालयारंभ अर्थात पितृपक्षास प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मात पितृपक्षात दिवंगत पितरांचे श्राद्धकर्म केले जाते. घरातील व्यक्ती ज्या तिथीला दिवंगत झाली असेल त्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची प्रथा-परंपरा चालत आलेली आहे. याशिवाय तर्पणविधी, पिंडदानादि विधीही केले जातात. यंदा पितृपंधरवड्यात ३० सप्टेंबरला भरणीश्राद्ध असून, ६ आॅक्टोबरला अविधवा नवमी आहे. तसेच दि. ८ आॅक्टोबरला एकादशी श्राद्ध आहे. दि. ११ आॅक्टोबरला शस्त्रादीहत् पितृश्राद्ध आहे. दि. १२ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावस्येने पितृपंधरवड्याची सांगता होईल. याचदिवशी सोमवती अमावस्याही असल्याने अमावस्या श्राद्धकर्म होईल. ज्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची मृत्यूची तिथी माहिती नसेल अथवा तिथी माहिती असूनही काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्धविधी करता आला नसेल त्यासाठी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धकर्म पार पाडावे, असे धर्मशास्त्राचे संकेत आहेत.