पिंपळगावला लवकरच ‘ई-टोल’ खासगी बॅँकांची मदत : आॅनलाइन वसुली
By Admin | Updated: March 4, 2015 00:55 IST2015-03-04T00:54:56+5:302015-03-04T00:55:20+5:30
पिंपळगावला लवकरच ‘ई-टोल’ खासगी बॅँकांची मदत : आॅनलाइन वसुली

पिंपळगावला लवकरच ‘ई-टोल’ खासगी बॅँकांची मदत : आॅनलाइन वसुली
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर येत्या महिनाभरात ‘ई-टोल’ प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी खासगी बॅँकांची मदत घेतली जात आहे. देशपातळीवर केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने ई-टोलसाठी निश्चित केलेल्या टोल नाक्यांमध्ये पिंपळगाव बसवंत टोल नाक्याचा समावेश करण्यात आल्याने सध्या टोलनाक्यावर यंत्र सामग्रीची जुळवाजुळव केली जात आहे. महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक असलेला पिंपळगाव बसवंत टोल नाका सुरू होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावतात. त्यामुळे बऱ्याच वेळा टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबवर रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा व वाहनचालकांचा वेळ वाया जातो. त्यातून वादावादीचे प्रसंगही घडतात. त्यामुळे सध्या या टोल नाक्यावर असलेल्या एकूण टोल वसुली खिडक्यांमधील चार खिडक्यांवर ‘ई-टोल’ प्रणाली कार्यान्वित करण्याचे ठरविण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे ई-टोल प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीमुळे वाहनचालकांचा वेळ वाचून वाहतूकही सुटसुटीत होण्यास मदत झाल्याने देशातील प्रमुख रस्त्यांवर प्रायोगिक पातळीवर ‘ई-टोल’ वसुलीची घोषणा गडकरी यांनी केली होती. त्यानुसार पिंपळगाव टोल नाक्यावर ‘ई-टोल’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेऊन ‘आयएसएमटीएल’ या तांत्रिक सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे.