मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन
By Admin | Updated: April 13, 2017 19:09 IST2017-04-13T19:09:55+5:302017-04-13T19:09:55+5:30
मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन

मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन
नाशिक : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गंगापूर गाव येथे उभारण्यात येणाऱ्या १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१३) झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित सोहळ्याचे वेबकास्टद्वारे थेट प्रक्षेपण महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत अभियानांतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील २८.७९ कोटी रुपये खर्चाचे मलनिस्सारण केंद्र तसेच नगरोथ्थान योजनेंतर्गत मालेगाव येथील २१.७२ कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल आणि चांदवड येथील ६४.०५ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करतानाच कामाची गुणवत्ता राखली न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला.